फर्ग्युसन रस्त्यावरील पबसमोर आंदोलन करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढारी
पुणे

Pune Drugs Case | गृहमंत्र्यांचे राजीनामे मागत ‘राष्ट्रवादी’चे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर एका पबमध्ये रात्री उशिरापर्यंत दारूविक्री आणि पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये अमली पदार्थांचेही सेवन सुरू असल्याचे उघडकीस झाल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पबसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी ड्रगमाफियांना, गुन्हेगारांना अधिकार्‍यांचे, मंत्र्यांचे अभय असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारच्या व मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

गृहमंत्री, उत्पादन शुल्क मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उदय महाले, राजीव साने, दिलशाद शेख, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, स्वप्निल जोशी, वंदना मोडक, गणेश नलावडे, स्वाती पोकळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. पालकमंत्री उत्तर द्या, गृहमंत्री उत्तर द्या, 50 खोके एकदम ओके, 50 खोके कोयता गँग ओके, 50 खोके ड्रगमाफिया ओके, गृहमंत्री राजीनामा द्या, उत्पादन शुल्क मंत्री राजीनामा द्या, मोदींसाठी मुरलीधर पुण्याची सुरक्षा वार्‍यावर, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

ड्रग्सचे माहेरघर

शहरात अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, कधीकाळी विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारे पुणे आता ड्रगचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. छोट्या-मोठ्या हॉटेल, बारमध्ये खुलेआम अमली पदार्थ मिळतात, गृहखात्याला मात्र याचा थांगपत्ताही नाही. तसेच, कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी निवडणुकीच्या चिंतनात आणि विधानसभेच्या जागावाटपात व्यस्त आहेत, असा आरोप या वेळी जगताप यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT