L3 पबमध्ये ड्रग्स सेवन करणाऱ्या एका तरुणाला मुंबईतून ताब्यात घेतले आहे  File Photo
पुणे

Pune Drugs Case | ‘एल-थ्री’ पार्टीतील ड्रगचे मुंबई कनेक्शन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लीझर लाउंज (एल-थ्री) पबमध्ये झालेल्या बेकायदा पार्टीत एमडी ड्रगचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एकाला मुंबईतील गोरेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानेच मुंबईहून पार्टीसाठी पुण्यात हे ड्रग आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.

कोण आहेत नितीन आणि करण?

नितीन ठोंबरे (वय 34, रा. गोरेगाव, मुंबई) व करण मिश्रा (वय 34, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघे एकमेकांचे मित्र असून, नितीननेच करणला पार्टीची माहिती दिली होती. दोघांना न्यायालयाने 29 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत हे दोघे ड्रग घेताना दिसून आले होते. एल-थ्री पबमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती. या पार्टीत तरुण ड्रग घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर प्रशासनाने सात ते आठ जणांना अटक केली.

ड्रग्स घेतल्याचे कबूल केले

सामील झालेल्या काही जणांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी दहा जणांच्या रक्ताचे नमुने ताब्यात घेतले. मात्र, रक्ततपासणीचा अहवाल मिळालेला नाही. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी पार्टीत ड्रग घेणार्‍या दोघांना मंगळवारी अटक केली. ठोंबरेला गोरेगाव तर मिश्राला मुंढव्यातून अटक केली. ठोंबरे हा आर्किटेक म्हणून नोकरी करतो, तर करण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ड्रग घेतल्याची कबूली दिली आहे.

अटकेच्या वेळीही सापडले ड्रग

आर्किटेक्ट असलेला नितीन ठोंबरे हा मूळचा मुंबईतील गोरेगावचा आहे. तो पार्टीच्या दिवशी मुंबईतून पुण्यात आला. त्याने मुंबईवरून येत असतानाच मेफेड्रॉन (एमडी) हे ड्रग आणले होते. त्यानंतर त्यांनी पार्टीत ड्रग सेवन केले. तत्पूर्वी, त्यांनी दुसर्‍या एका ठिकाणी पार्टी केली होती. ठोंबरेला मुंबईतून पुणे पोलिसांनी पकडल्यानंतर देखील त्याच्याकडे 5 ग्रॅम एमडी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोघांना पोलिस कोठडी

नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा यांना मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी पार्टीचे आयोजन करणारा कामठे, मद्य पुरविणारी व्यक्ती आणि अमली पदार्थ, याबाबतची माहिती दोन्ही आरोपींना आहे. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून गेत दोघांना शनिवारपर्यंत (दि. 29) पोलिस कोठडी सुनावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT