पुणेः अमली पदार्थ तस्कारी प्रकरणात फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला मीरा भाईंदर पोलिस अटक करत असताना त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार रक्तदाब वाढल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. मात्र शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. ही घटना कोंढवा येथे शुक्रवारी (दि.17) संध्याकाळी घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अझीम अबू सालेम उर्फ अझीम खान (५१, रा.मीरा -भाईंदर) असे मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी, कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Pune News)
अझिम याच्यावर अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यालील काशीगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका मेफेड्रोन प्रकरणात मीरा-भाईंदर पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रत्नागिरी, कोल्हापूरमार्गे पुण्यात धाव घेतली होती. तीन दिवसांपूर्वीच अझम खान कोल्हापूरहून पुण्यात येऊन कौसरबागमधील एका तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये रहात असल्याची तांत्रिक माहिती मिळाली त्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंढवा पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली.
पोलिस घटनास्थळी गेल्यावर सदनिकेचे दार आतून बंद होते. पोलिसांनी बराच वेळ दार ठोठावले, पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी खान पोलिसांवर झेपावला आणि एका कॉन्स्टेबलच्या छातीत चावा घेतला. त्यावेळी पोलिसांनी त्याला दूर ढकलले. यावेळी झालेल्या गोंधळात खान अचानक बेशुद्ध पडला आणि जमिनीवर कोसळला.
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले की, त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मृत घोषीत केले गेले. ही सदनिका त्याच्या मैत्रिणीची असल्याचे प्राथमिक तपासात समजत आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समजेल असे देखील घाडगे यांनी सांगितले.