पुणे

Pune Drugs Case : ललित पाटील याला सहाय्य करणारा कर्मचारी अटकेत

Laxman Dhenge

पुणे: पुढारी वृत्तसेवा : ड्रग माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयात असताना ड्रग रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांच्या छाप्यात निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 14 जणांना पोलिसांनी अटक केली असून ड्रग तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणात ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये कैद्यांची बडदास्त ठेवणारा आणि ललित पाटील याला सहाय्य करणारा कर्मचारी महेंद्र शेवते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे. शेवते याच्या अटकेमुळे ससून रुग्णालयातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर आरोप करत त्यांना सदर प्रकरणात आरोपी करा आणि अटक करा अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ठाकूर यांना सहाय्य करणारा आणि कैद्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा महेंद्र शेवते याच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ससून रुग्णालयातील कोणालाही अटक केली नव्हती.

याच्या निषेधार्थ बुधवारपासून आमदार धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालय समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर लगेच शेवते याची अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. शेवते हा ससून रुग्णालयातील जुना कर्मचारी असून त्याच्या तपासामध्ये नेमके कोणत्या कोणत्या कर्मचारी आणि डॉक्टरांचे नावे निष्पन्न होतात हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. त्याच सोबत त्यानी नेमके पैसे कोणाकोणाला दिले ही देखील माहिती बाहेर येण्याची अपेक्षा आहे. याप्रकरणात अतातपर्यंत दहा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असून दोन पोलिसांना बडतर्फ करून अटक देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT