पुणे

Pune Drugs Case : शेवतेच्या अटकेनंतर बडे मासे लागणार गळाला?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रगतस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये आतापर्यंत ससूनमधील कोणालाही अटक झाली नव्हती. मात्र, चतुर्थश्रेणी कर्मचारी महेंद्र शेवतेला अटक झाल्यावर अनेक बडे मासे गळाला लागणार असल्याचे बोलले जात आहे. ललित पाटीलकडून वरिष्ठांपर्यंत पैशांची देवाण-घेवाण कशी झाली, ससूनमध्ये यासाठी कशी साखळी कार्यरत होती, या सर्व गोष्टींचा खुलासा होण्याची दाट शक्यता आहे.
ललित पाटील पोलिसांसह ससूनमधील डॉक्टरांना लाखो रुपये देऊन काम साधत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ललित पाटीलला अटक झाल्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आणि अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा पदभार काढून घेतला. मात्र, ससूनमधील कोणत्याही कर्मचार्‍यावर किंवा डॉक्टरांवर पोलिस कारवाई झाली नव्हती. आर्थिक हितसंबंधांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असूनही आपल्याला कोणीही हात लावू शकणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र, पैशांच्या देवाण-घेवाणीमध्ये आरोपी म्हणून संशय असलेल्या कर्मचारी शेवतेला अटक झाल्यावर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 'शेवते जात्यात, तर आपण सुपात' असल्याची जाणीव झाल्याने अनेकांना घाम फुटल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आता यानंतर कोणाचा नंबर लागणार, पोलिस कोणाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भरपूर माया कमावल्याची चर्चा

महेंद्र शेवते अनेक वर्षांपासून ससून रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सर्जरी विभागात कार्यरत आहे. शेवते ललित पाटीलची सर्व कामे पाहत असल्याचे आणि कैद्यांची बडदास्त ठेवण्याचे काम करीत असल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयातील अनेक प्राध्यापक, विभागप्रमुख दुचाकीवरून रुग्णालयात येतात. दहा-बारा तासांची ड्युटी निभावतात. संबंधित कर्मचारी मात्र आलिशान गाडीतून येत असल्याने अनेकांनी पाहिले आहे. त्याने आपल्या 'अर्थ'कारणाच्या अनुभवातून गाड्या, जमीन अशी भरपूर माया कमावली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT