Pune Kharif Crop Survey Pudhari
पुणे

Pune Kharif Crop Survey| आठ तालुक्यांतील पिकांचे पंचनामे प्रत्यक्ष बांधावर जाऊन करा: जितेंद्र डुडी

दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश; आठवड्यात अहवाल सादर करावा लागणार.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आठ तालुक्यांतील खरीप पिकांचे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. तसेच पंचनाम्याचा सविस्तर अहवाल एका आठवड्यात सादर करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, राजगड, दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर आणि खेड या आठ तालुक्यांमध्ये पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

या तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकांची सद्यःस्थिती आणि झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

पंचनामे करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांमध्ये तलाठी, ग्रामसेवक तसेच महसूल विभागातील अधिकार्‍यांचा समावेश आहे. संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले आहे.

पिकांची स्थिती, नुकसानीचे प्रमाण आणि दुष्काळाचा पिकांवर झालेला परिणाम याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT