Pune Water Pollution NCP Protest Pudhari
पुणे

Pune Drinking Water Safety: पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; महापौरांना वॉटर प्युरिफायर भेट देत राष्ट्रवादीचे आंदोलन

खडकवासला धरण परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या सांडपाण्याचा मुद्दा उपस्थित; दोषींवर कठोर कारवाईची मागणी, पालकमंत्र्यांनाही प्युरिफायर देण्याची भाजपची सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. १६) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. महापौर मंजूषा नागपुरे यांना वॉटर प्युरिफायर भेट देत नगरसेवकांनी खडकवासला धरण परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित केला. धरण परिसरातील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांचे सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्याने सभागृहात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, स्थायी समितीच्या सदस्य वैशाली बनकर, सुहास टिंगरे, अमोल बालवडकर, नंदिनी धेंडे, रवी टिंगरे आदी नगरसेवक सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सोमवारी (दि. १२) खडकवासला धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी आणि कुडजे परिसरातील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते.

या प्रकारामुळे पुणेकरांना पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. धरण परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. महापौरांना वॉटर प्युरिफायर भेट देऊन शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

धरण परिसरातील सांडपाणी सोडण्याबाबतच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडणाऱ्या आस्थापनांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तसेच, पुणेकरांना सुरक्षित पाणीपुरवठा होत असल्याची खात्री करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पालकमंत्र्यांनाही प्युरिफायर भेट देण्याची मागणी

महापौरांना वॉटर प्युरिफायर भेट देण्याच्या आंदोलनावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे नगरसेवक पुनीत जोशी यांनी वेगळी भूमिका मांडली. पुणे शहराला दूषित पाणीपुरवठा होण्यामागे जिल्ह्यातील उद्योग जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे महापौरांना प्युरिफायर भेट देण्याऐवजी प्रथम जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना वॉटर प्युरिफायर भेट द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दूषित पाण्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीने प्रशासनाला लक्ष्य केले असतानाच भाजपच्या नगरसेवकाने उद्योगांच्या भूमिकेवर बोट ठेवल्याने सभागृहातील चर्चेला वेगळे वळण मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT