कोंढवा: महंमदवाडीत ओढ्यामध्ये दुर्गंधीयुक्त आणि ड्रेनेजमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सांडपाण्यामुळे ओढ्याच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.
ओढ्यातून वाहणाऱ्या दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त होत आहे.
सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न इतका गंभीर असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी करून वेळ मारून नेऊ नये, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणाची तातडीने पाहणी करून ओढ्यात सोडले जाणारे ड्रेनेजमिश्रित पाणी तत्काळ बंद करावे, दूषित पाण्याचा निचरा करून परिसराची स्वच्छता करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन आणखी किती दिवस डोळेझाक करणार? दूषित सांडपाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही परिसरातून दिला जात आहे.
स्मार्ट सिटीला कचऱ्याचा विळखा
एकीकडे पुण्यातील स्मार्ट आणि विकसित परिसर म्हणून ओळख असलेल्या बालेवाडी-बाणेरच्या सुंदरतेचा अभिमान बाळगला जात असताना, दुसरीकडे मात्र या भागाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. बालेवाडीतील दसरा चौक ते लक्ष्मीमाता मंदिर परिसरात सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या अस्वच्छतेचे फोटो आणि व्हिडीओ प्रशासनासह लोकप्रतिनिधींना पाठवून तातडीने कचरा उचलण्याची विनंती केली आहे. वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने 'प्रत्येक वेळी फोटो काढून आणि तक्रारी करूनच स्वच्छता करून घ्यायची का' असा उद्विग्न सवाल आता नागरिक विचारत आहेत.
दसरा चौक ते लक्ष्मीमाता मंदिर परिसरातील कचरा महापालिकेने त्वरित उचलून परिसर स्वच्छ करावा, परिसराच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
प्रशासनाने तातडीने ओढ्यातून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त करावा. मी स्वतः या ठिकाणी पाहणी करणार असून, लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. प्रशासनाने डोळे झाक केली, तर ती खपवून घेतली जाणार नाही.अतुल तरवडे, नगरसेवक
ओढ्यात ड्रेनेजमिश्रित पाणी येतेय कोठून याची पाहणी केली जाईल. ज्या सोसायटीने हे पाणी ओढ्यात सोडले आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. या पाण्याचा लवकरच बंदोबस्त केला जाईल.सुचिता पानसरे, सहायक आयुक्त, कोंढवा क्षेत्रीय कार्यालय
सध्या नवीन कर्मचारी आणि ठेकेदारामुळे कचरा व्यवस्थापनाचे नियोजन सुरळीत करण्यासाठी वेळ लागत आहे. कचरा रस्त्यावर राहू नये, यासाठी या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या तीन-चार परिसरातील सर्व कचरा उचलला जाईल.विजय नाईकल, सहायक आयुक्त, औंध क्षेत्रीय कार्यालय