पुणे: महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे केली आहे.
महापौरांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यानुसार गेल्या चार वर्षांत जवळपास 3,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. याशिवाय ‘जायका’ प्रकल्पासाठी चालू वर्षाअखेर सुमारे 900 कोटी रुपये खर्च झाले असून, सध्याच्या आर्थिक वर्षात इतर कामांमध्ये कपात करून 289 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून 280 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील 125 कोटी रुपये पूरप्रवण भागांसाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, या निधीचा नेमका वापर कसा झाला, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत ड्रेनेज विभागाने सुमारे 42 कोटी रुपयांचा खर्च केल्याची नोंदही त्यांनी केली आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांना मोठ्या प्रमाणावर मानधन देण्यात आले, तसेच विविध कामांची बिले काढली असली, तरी प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेषतः नव्याने समाविष्ट झालेल्या नऊ गावांमध्ये ड्रेनेज व्यवस्थेची अत्यंत वाईट स्थिती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.