डबल डेकर उड्डाणपुलाची एक बाजू लवकरच होणार खुली; 90 टक्के काम पूर्ण  Pudhari
पुणे

Double Decker Flyover: डबल डेकर उड्डाणपुलाची एक बाजू लवकरच होणार खुली; 90 टक्के काम पूर्ण

औंध ते शिवाजीनगर उड्डाणपुलावरून करता येणार प्रवास

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलाची एक बाजू 20 ऑगस्टपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रशासकीय हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मेट्रो आणि वाहनांची एकाच वेळी वाहतूक करण्यासाठी हा ‘डबल डेकर’ पूल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही हा पूल अतिशय महत्त्वाचा असणार आहे. सद्य:स्थितीत या उड्डाणपुलाचे एकूण काम 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. (Latest Pune News)

सर्व काम ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीए प्रशासनाने केले आहे. तर, या उड्डाण पुलाच्या औंधहून शिवाजीनगरपर्यंत येणार्‍या एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा एका बाजूचा रस्ता वाहनचालकांसाठी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट किंवा ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत ही एक बाजू सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच औंध, बाणेर, पाषाण आणि हिंजवडीला जाणार्‍या चाकरमान्यांना याचा वापर करता येईल.

30 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ मंजूर

कार्यकारी समितीने दिनांक 12 जून 2025 च्या बैठकीत एकात्मिक डबल डेकर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. उड्डाणपुलाची एक बाजू (औंध ते शिवाजीनगर दिशा) 20 ऑगस्ट किंवा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन आहे आणि प्रकल्पाची उर्वरित कामे ऑक्टोबर 2025 च्या अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

...अशी झाली पुलाच्या कामाला सुरुवात

विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेने आणि पुणे महानगरपालिकेच्या ना-हरकत प्रमाणपत्राने (एनओसी) ऑगस्ट 2020 मध्ये विद्यमान दोन एकेरी उड्डाणपूल पाडण्यात आले.

एकात्मिक डबल डेकर फ्लायओव्हरची संकल्पना पुणे महानगरपालिका आणि पुणे युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (पुमटा) यांनी मंजूर केली आहे. या कामाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 26 मे 2020 रोजीच्या पत्राद्वारे एकात्मिक डबल डेकर फ्लायओव्हरच्या मसुद्याला मान्यता दिली आहे.

विद्यापीठ पुलाच्या कामाची सद्य:स्थिती

डबल डेकर उड्डाणपुलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे आणि सध्या 88 ते 90 टक्क्यांपर्यंत त्याचे काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी आणि सध्याच्या वाहतुकीसाठी पुरेशी जागा सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिका विकास आराखड्यानुसार गणेशखिंड रस्ता 45 मीटरपर्यंत रुंद केला जात आहे.

उड्डाणपुलाच्या शिवाजीनगर आणि औंध बाजूच्या रॅम्पचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. बाणेर आणि पाषाण बाजूच्या उर्वरित रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाची औंध ते शिवाजीनगर एक बाजू सुरू झाल्यावर नक्कीच येथील वाहतुकीवर मोठा फरक पडणार आहे. संपूर्ण गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच, उर्वरित पाषाण आणि बाणेर बाजूचा रस्ताही प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करावा.
- मयूर मुंडे, औंध परिसरातील रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT