Ganeshotsav Sound System Ban Pudhari
पुणे

DJ Noise: उत्सवाचा आनंद घ्या; पण दुसऱ्याच्या शांततेची किंमत मोजून नव्हे!

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर विद्याधर अनास्कर यांचा सवाल; ‘डीजे हवा की नको’पेक्षा ‘किती आणि कसा वापरावा?’ यावर चर्चा व्हावी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उत्सव साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आनंद व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य आहे. मात्र, त्या आनंदाची किंमत दुसऱ्या नागरिकाने आपल्या शांततेचा त्याग करून चुकवावी, हे योग्य नाही. त्यामुळे समाजानेच एक समतोल भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. ‘‘उत्सवाचा आनंद घ्या; पण दुसऱ्याच्या शांततेची किंमत मोजून नव्हे,’’ असे मत बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले आहे.

परंतु, दुसऱ्या बाजूला त्याच डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण, रात्रपाळी करून आलेले कामगार आणि परिसरातील इतर नागरिकांना त्रास होत असेल, तर त्यांच्या शांततेच्या अधिकाराचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

शहरात सध्या डीजेच्या वापराबाबत सुरू असलेली चर्चांवर त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. समाजातील बहुसंख्य लोकांना एखादी गोष्ट आवडते म्हणून ती योग्य ठरते का? आज लग्नसमारंभ, मिरवणुका, धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम अशा अनेक प्रसंगी डीजेचा वापर केला जातो. तरुणाईला त्यातून आनंद मिळतो, उत्साहाचे वातावरण निर्माण होते आणि अनेकांना तो आपल्या उत्सवाचा अविभाज्य भाग वाटतो. त्यामुळे “लोकांना आवडते, मग त्याला विरोध का?” असा प्रश्नही उपस्थित केला जातो.

या स्थितीत “डीजे हवा की नको?” असा नसून, “डीजेचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा?” असा असला पाहिजे. समाजाला जे योग्य वाटते ते योग्य, हे तत्त्व स्वीकारायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटकाचा विचार त्यात झाला पाहिजे. केवळ डीजे समर्थकांची संख्या अधिक आहे, म्हणून त्यांचीच भूमिका योग्य ठरू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT