Pune DJ Ban Protest Pudhari
पुणे

Pune DJ Ban Protest: पुण्यात डीजेविरोधात धडक मोर्चा! ‘उत्सव आमच्या बाप्पाचा, नाही तुमच्या डीजेचा’

कोथरूडमध्ये लाउड स्पीकर विरोधी मंचाचे आंदोलन; डीजे सिस्टिमवर कायमस्वरूपी बंदी आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर बनत आहेत. या पार्श्वभूमीवर डीजे सिस्टिमवर कायमस्वरूपी बंदी घालावी, ही प्रमुख मागणी कोथरूड भागात शनिवारी (दि.१२) रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे करण्यात आली.

पुण्यातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात लाउड स्पीकर विरोधी मंचाच्या वतीने शनिवारी (दि. १२) सायंकाळी कोथरूड भागात धडक मोर्चा काढण्यात आला. कोथरूड येथील कर्वे पुतळा ते मृत्युंजय मंदिर दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी ‌'उत्सव आमच्या बाप्पाचा, नाही तुमच्या डीजेचा‌' आणि ‌'एक, दोन, तीन, चार... डीजे करा हद्दपार' अशा विविध फलक आणि जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

मोर्चाच्या समाप्तीनंतर मंचाच्या शिष्टमंडळाने अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले. या आंदोलनात मुकुंद किर्दत, नीलम पंडित, संदीप बर्वे, ग. ह. देव, नितीन बापट, नागेश नलावडे, शेखर हळदणकर, अशोक मेहंदळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT