पुणेः ऐन दिवाळीच्या धामधुमीत शहरातील विविध भागांत घरफोडीच्या चार घटना घडल्या आहेत. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समर्थ, पर्वती, वाघोली आणि काळेपडळ परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सहा लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केला आहे. (Latest Pune News)
मंगळवार पेठेतील मोती मस्जिदसमोर शितोळे बिल्डिंग येथे राहणाऱ्या एका 53 वर्षीय व्यक्तीचे घर 11 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत बंद असताना चोरट्यांनी फोडले. चोरट्याने घरातील कपाटातील ड्रॉवर उचकटले. त्यातून दोन लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या फिर्यादीवरून समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरी घटना वाघोली परिसरात घडली. यात चार लाखांचे दागिने चोरीला गेले. वाघोलीतील कोणार्क एक्झॉटिका सोसायटीत राहणाऱ्या एका 44 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे दिवाळीनिमित्ताने बाहेर गेले असताना, 14 ते 17 ऑक्टोबर यादरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचे सेफ्टी डोअर बनावट चावीने उघडले. त्यानंतर कपाटातील 81 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महंमदवाडीतील एनआयबीएम रस्त्यावरील नाईन हिल्स सोसायटीत घरफोडीची घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 ते 19 ऑक्टोबरदरम्यान घडली. चोरट्याने घरात प्रवेश करून दोन लाख 65 हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने व रोख रकमेची चोरी केली. काळेपडळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे.