पुणे: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान पुणे शहरात विविध ठिकाणी आगीच्या ४८ हून अधिक घटना घडल्या. दुपारी ३ ते रात्री १० या ७ तासांच्या कालावधीत अग्निशमन दलाकडे आगीच्या ४८ वर्दींची नोंद झाली. शहरातील झाडे, गवत, कचरा, घरांच्या गॅलरी, इमारतींचे टेरेस, दुकाने आणि गोदामांना आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फटाक्यांची ठिणगी पडल्याने कोंढवा येथील कडनगर चौकातील पडीक इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग लागली. धायरीतील डीएसके विश्व परिसरातील मोकळ्या मैदानातील गवत, शिवाजीनगरमधील शिरोळे रस्त्यावरील झाड आणि काशेवाडीतील हरकानगर परिसरातील कचऱ्याने पेट घेतला.
सायंकाळनंतर आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. सदाशिव पेठेतील नागनाथ पार, वडगाव बुद्रुक, कात्रज, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड, नाना पेठ, भवानी पेठ, खराडी, टिंगरेनगर, शुक्रवार पेठ, गंज पेठ, पाषाण आणि वारजे परिसरात आगीच्या घटना घडल्या.
काही ठिकाणी इमारतींच्या गॅलरी आणि फ्लॅटमध्ये, तर काही ठिकाणी झाडे आणि मोकळ्या जागेतील गवताला आग लागली. फुरसुंगी येथील गोदामालाही आग लागली. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध ठिकाणी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दलाकडून आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
सिटीप्राईडजवळ फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला आग
सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चित्रपटगृहाजवळ सोनावणे इंडस्ट्रिज येथील फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.