पुणे: राज्यात दहावीच्या परीक्षेत मुलींनी वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यात पुणे विभागात देखील मुलीच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात एकूण एक लाख 42 हजार 641 मुले, तर एक लाख 24 हजार 15 अशा दोन लाख 66 हजार 656 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख 64 हजार 992 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील एक लाख 30 हजार 667 मुले, तर एक लाख 19 हजार 86 असे एकूण 2 लाख 49 हजार 753 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.24 टक्के आहे.
मुलांची टक्केवारी 95.33, तर मुलींची टक्केवारी 97.70 आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात 2.37 टक्के अहिल्यानगर जिल्ह्यात मुलांची टक्केवारी 90.40, तर मुलींची टक्केवारी 95.53 आहे. त्यामुळे आहिल्यानगर जिल्ह्यात 5.13 टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात मुलांची टक्केवारी 87.91, तर मुलींची टक्केवारी 95.32 इतकी आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 7.41 टक्के मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा जास्त आहे.
यावरून विभागील तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेबुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) मे सकाळी साडेअकरा वाजता जाहीर केला. यावेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह शिक्षण विभागातील जवळपास सर्व अधिकारी उपस्थित होते. यंदा दहावीच्या पुणे विभागाचा निकाल 94.24 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात राज्यातील नऊ विभागांमध्ये पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याने अव्वलस्थान पटकावले आहे.
पुणे विभागातून 4 हजार 631 पुनर्परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून परीक्षेसाठी प्रवीष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 502 आहे, तर यातून केवळ 1 हजार 384 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 30.74 टक्के आहे. दहावीमध्ये पुणे विभागातील 75 हजार 653 विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. राज्यात मुलींनी बाजी मारलेली असताना पुणे विभागात यंदाही मुलींचेच वर्चस्व राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागात पुणे जिल्हा अव्वल
पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक 96.46 टक्के लागला आहे. अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांचा निकाल 92.69 टक्के आहे, तर सोलापूर जिल्हा तिसऱ्या स्थानावर असून त्यांचा निकाल 91.31 टक्के आहे. पुणे जिल्ह्यातून एक लाख 32 हजार 707 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक लाख 28 हजार 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातून एकूण 67 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 63 हजार 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातून 64 हजार 315 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 58 हजार 727 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय विभागातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.