Pune district highest dengue cases
पुणे: पावसाळा, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. राज्यभरात डेंग्यू-चिकुनगुनियासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. येत्या 21 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात डेंग्यूचे 5 हजार 962 रुग्ण आढळले असून, त्यापैकी पुणे जिल्ह्यातील तब्बल 265 रुग्ण हे सर्वाधिक आहेत.
पुण्यानंतर पालघर (232), अकोला (200) व अमरावती (132) या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात याच कालावधीत डेंग्यूमुळे 26 संशयित मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. (Latest Pune News)
गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात 2,895 डेंग्यू रुग्ण होते. यंदा रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी पुणे जिल्हा डेंग्यू हॉटस्पॉट ठरत आहे. दरम्यान, राज्यभरात चिकुनगुनियाचे 1,945 रुग्ण आढळले आहेत. त्यात पुणे जिल्ह्याचे 176 रुग्ण असून हा आकडा राज्यातील दुसर्या क्रमांकाचा आहे.
पुणे महापालिका हद्दीत गेल्या दोन महिन्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये 39 डेंग्यू रुग्ण व 1,113 संशयित रुग्ण आढळले, सात जणांना चिकुनगुनिया झाला. केवळ ऑगस्ट महिन्यातच 28 डेंग्यू व पाच चिकुनगुनिया रुग्ण नोंदवले गेले. यंदा ऑगस्टअखेरपर्यंत पुणे शहरात एकूण 51 डेंग्यू रुग्ण, 1,366 संशयित रुग्ण आणि 17 चिकनगुनिया रुग्ण आढळले असल्याचे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.