Digital Arrest Fraud Pudhari
पुणे

Pune Digital Arrest Fraud: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठाची १०.७४ कोटींची फसवणूक; रीलस्टार मुख्य सूत्रधाराला अटक

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून धमकावले; ५,४३६ बँक खात्यांत व्यवहार, २९ गुन्हे उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला तुमचे बँक खाते एका गुन्ह्यात पैसे घेण्यासाठी वापरण्यात आले असून, याबाबत तुम्हाला अटक होऊ शकते. अटक टाळण्यासाठी तब्बल १० कोटी ७४ लाख रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक करणाऱ्या रीलस्टार तसेच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून त्याने वृद्ध नागरिकाला धमकावले होते. या टोळीने केलेले २९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

रोहन रामेश्वर जाधव (वय अपार्टमेंट, गजानननगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दाखल केला होता. या गुन्ह्यात यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले (वय २६, रा. कर्वेनगर), समर्थ सुरेश देशमुख (वय २४), अमर अत्तरगी (वय २४) तसेच प्रणव करणसिंग आर्या (वय ३१, रा. दिल्ली) यांना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींनी ज्येष्ठाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भीती दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहन जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्याचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. तो पिंपळे गुरव भागात राहतो. रीलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. दि. २३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा वापर करून त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडले. या खात्याचा वापर यापूर्वी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात आढळून आला. संबंधित खात्यावर २४ जणांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. टोळीने 'तुम्हाला अटक होणार आहे, तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही अटक होऊ शकते', अशी भीती वृद्ध नागरिकाला दाखवली.

तसेच गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग करण्यास सांगितले. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ही फसवणूक केली. त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरून घेत एकूण १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली. तांत्रिक तपासादरम्यान फसवणुकीच्या रकमेपैकी ३० जानेवारी रोजी एका बँक खात्यात ७५ लाख रुपये भरल्याचे समोर आले. नंतर त्या खात्यातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ६ लाख ५० हजार रुपये वर्ग करण्यात आले होते. सायबर क्राइम पोर्टलवरून मिळालेली माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे रोहन जाधवला पिंपळे गुरव येथून ताब्यात घेण्यात आले.

५,४३६ खात्यांत पैसे वर्ग

या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले. तसेच तब्बल ५,४३६ बँक खात्यांमध्ये तक्रारदारांच्या पैशांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर पसरलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT