पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकास आराखड्याला (डीपी) अखेर दिवाळीचा मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार नऊ समाविष्ट गावांचा प्रारूप विकास आराखडा नगररचना विभागाने जाहीर केला आहे. त्यावर हरकती-सूचना दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा प्रारूप आराखडा व त्याचे नकाशे महापालिका व नगररचना यांच्या कार्यालयात तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांना पाहता येणार आहे.(Latest Pune News)
महापालिका हद्दीलगतची 11 गावे 4 ऑक्टोबर 2017 मध्ये पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जून 2018 मध्ये इरादा जाहीर करण्यात आला. मात्र, कोरोना महामारीमुळे हा आराखडा तयारी करण्यासाठी शासनाने महापालिकेला मुदतवाढ दिली होती. त्यानुसार दि. 2 मार्च 2024 पर्यंत प्रारूप आराखडा जाहीर करण्याची मुदत होती. मात्र, या कालावधीत पालिकेने आराखडा जाहीर न केल्याने राज्य शासनाने महापालिकेच्या ताब्यातून हा आराखडा काढून घेतला होता. त्यानंतर नगररचना विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
सहाय्यक संचालक अभिजित केतकर यांची आराखडा करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार दि. 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत आराखडा मंजूर करण्याची मुदत होती. मात्र, मुदतीआधीच नगर विभागाने हा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर या आराखड्याचे नकाशे जाहीर करण्यात आले आहेत.
तसेच महापालिका व नगररचना यांच्या कार्यालयात ते नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यावर आता पुढील 60 दिवसांत हरकती-सूचना नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. पुणे महापालिका बांधकाम विभाग आणि सहाय्यक संचालक, नगररचना, पुणे शाखा, पुणे; नवीन प्रशासकीय इमारत, बी विंग, तिसरा मजला, विधान भवनासमोर या दोन ठिकाणी हरकती-सूचना दाखल करता येणार आहेत.
महापालिकेत समाविष्ट 9 गावांची लोकसंख्या 2025 नुसार 6 लाख इतकी आहे. त्यानुसार 2035 ची 8. 1 लाख लोकसंख्या विचारात घेऊन विकास आराखड्यात सोयी-सुविधांची वेगवेगळी आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या 9 गावांमध्ये एकूण साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र असून, त्याचे नियोजन करताना 374 हेक्टर क्षेत्रावर आरक्षणे प्रस्तावित केली आहेत. म्हणजेच, एकूण क्षेत्राच्या 8 टक्के क्षेत्र आरक्षणाखाली आहे. याशिवाय रस्ते व दळणवळणाखाली अंदाजित 15 टक्के क्षेत्र आहे. तसेच, प्राथमिक व माध्यमिक शाळा यासाठी 41 हेक्टर क्षेत्र आरक्षित करण्यात आले असून, वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी 18 हेक्टर इतक्या क्षेत्राची आरक्षणे प्रस्तावित आहेत. मैदाने स्पोट्र्स सेंटर इत्यादीखाली 74 हेक्टर व गार्डनखालील 88.12 हेक्टर इतके क्षेत्र आरक्षणाखाली सामाविष्ट आहे.
एकूण 09 गावांमधील लोकसंख्या वाढते नागरीकरण विचारात घेता एकूण 42 टक्के इतके क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्यात आले आहे. या आराखड्यात 45 मी., 36 मी., 30 मी., 24 मी. व 18 मी. रुंदीचे मोठे रस्ते अस्तित्वातील विकास विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आले आहेत. या आराखड्याचे वैशिष्ट्य म्हणजे स्पॉज गार्डन ही आरक्षणे जलाशयालगत प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पूरनियंत्रण व भूजलपातळी वाढविण्यासाठी मदत होणार आहे. हा आराखडा जीआयएस प्रणालीवर तयार करण्यात आल्याने अचूक व योग्य पद्धतीने तयार करण्यात आल्याचा दावा नगररचना विभागाकडून करण्यात आला आहे.
1) लोहगाव (उर्वरित)
2) केशवनगर 3) साडेसतरानळी
4) शिवणे (उर्वरित)
6) आंबेगाव खुर्द 7) उंड्री
8) धायरी 9) आंबेगाव बु. (उर्वरित) तसेच उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे आराखड्याचे काम सुरू असतानाच पुणे महापालिकेतून वगळण्यात आली.