Destination Wedding Pudhari
पुणे

Pune Destination Wedding: पुण्याच्या निसर्गरम्य ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड; लोणावळा, मुळशीसह ३० ते ३५ ठिकाणांना पसंती

गोवा-केरळऐवजी पुण्याच्या आसपास विवाह सोहळ्यांना तरुण जोडप्यांची पसंती; रिसॉर्ट, हॉटेल्स आणि लॉन्सचे मार्चपर्यंत बुकिंग

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आपल्या लग्नाचा प्रत्येक क्षण इतरांपेक्षा वेगळा आणि अविस्मरणीय असावा, असे स्वप्न आजची तरुण पिढी पाहत आहे. याच स्वप्नपूर्तीसाठी गोवा, केरळ किंवा दूरच्या पर्यटनस्थळांकडे धाव घेण्याऐवजी आता अनेक जोडपी पुण्याच्या आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणांना पसंती देत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिरवीगार वनराई, धरणांचा विस्तीर्ण जलाशय आणि आल्हाददायक वातावरणाच्या साक्षीने विवाह सोहळे करण्याचा ट्रेंड यंदा चांगलाच बहरला आहे.

लोणावळा, मुळशी, भीमाशंकर, पौड, पानशेत, खडकवासला, भोर, आंबेगाव, मळवली आणि कामशेत, अशा ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगची लगबग वाढली असून, इव्हेंट कंपन्याही या सोहळ्यांचे नियोजन करीत आहेत. निसर्गसान्निध्य, आधुनिक सोयीसुविधा आणि तुलनेने किफायतशीर बजेट, यामुळे पुणे जिल्हा हा डेस्टिनेशन वेडिंगसाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे.

सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत या विवाह सोहळ्यांची लगबग वाढली आहे. मार्चपर्यंत अनेक विवाहमुहूर्त असल्याने रिसॉर्ट, हॉटेल्स आणि लॉन्सचे बुकिंग केले जात आहे. पारंपरिक मंगल कार्यालयांऐवजी निसर्गरम्य परिसरात आवडत्या थीमनुसार विवाह करण्याकडे तरुण जोडप्यांचा कल आहे. महाराष्ट्रीय संस्कृती, कार्निव्हल, बॉलिवूड, अरेबियन, अशा विविध थीमवर आधारित सजावट, संगीत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पुण्यापासून जवळ असलेली ठिकाणे, पाहुण्यांच्या निवासाची सोय, प्रवासाची उपलब्धता आणि तुलनेने कमी खर्च, यामुळे पुणे परिसराला पसंती मिळत आहे.

या ट्रेंडमुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांसह केटरिंग व्यावसायिक, मंडप व्यावसायिक, सजावटकार आणि छायाचित्रकारांनाही मोठ्या प्रमाणावर काम मिळत आहे. पुणे रेस्टॉरंट ॲण्ड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले की, सध्याच्या लग्नसराईसाठी बँक्वेट हॉल आणि मंगल कार्यालयांचे मार्चपर्यंत बुकिंग झाले आहेत. केटरिंगपासून मंडप व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच काम मिळत आहे. पुण्याच्या आसपास डेस्टिनेशन वेडिंगसाठी ३० ते ३५ ठिकाणे उपलब्ध असून, येथील बँक्वेट हॉल, रिसॉर्ट, हॉटेल्समध्येही बुकिंग झाले आहे. पुण्यात बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करता येत असल्याने पुण्याला पसंती दिली जात आहे.

थीमपासून मेकअपपर्यंत संपूर्ण नियोजन

डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सजावट, संगीत, केटरिंग आणि मेकअप अशा प्रत्येक बाबीचे नियोजन जोडप्यांच्या आवडीनुसार केले जाते. एका विवाह सोहळ्यासाठी सुमारे २० जणांची टीम कार्यरत असते. किमान १५ दिवस आधीपासून तयारी सुरू केली जाते. पुण्यातही अशा विवाह सोहळ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे इव्हेंट अँड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे सदस्य निखिल कटारिया यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT