पुणे: डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना, दुसरीकडे गृहनिर्माण सोसायट्यांकडूनच या मोहिमेला अडथळे आणले जात असल्याचे समोर आले आहे.
डासांच्या अळ्यांची तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकांना सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, महापालिकेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
विशेष म्हणजे, झोपडपट्ट्यांपेक्षा उंच इमारती आणि आलिशान निवासी संकुलांमध्येच डेंग्यूच्या डासांची पैदास अधिक होत असल्याचे संयुक्त सर्वेक्षणात उघड झाले आहे.
राज्य आरोग्य विभाग आणि पुणे महापालिकेने ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात केलेल्या संयुक्त सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला.
रामटेकडी आणि वैदुवाडी येथील झोपडपट्ट्यांमधील सुमारे १६० घरांची तपासणी केली असता, अळ्या आणि अंडी आढळलेली केवळ दोन पाण्याची भांडी सापडली. याउलट धनकवडी-सहकारनगर, औंध-बाणेर, कोथरूड, येरवडा आणि नगर रस्ता परिसरातील उंच इमारतींच्या वसाहतींमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळले आहेत.
शहरातील बहुतांश ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहेत. काही बांधकाम रखडलेले असल्याने अनेक ठिकाणी राडारोडा, घाण असल्याने या ठिकाणी साचलेल्या पाण्यात अळ्या आढळून येत आहेत.
तसेच कुंड्यांमधील पाणी, घरगुती भांडी, एअर कंडिशनरचे ट्रे तसेच बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरत आहे. कोथरूडमधील पुनर्विकास प्रकल्पांच्या परिसरातही रुग्णांचे समूह आढळले आहेत.
याबाबत महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात असल्याचे समजताच काही सोसोयट्यांनी संबंधित पथकांना सोसोयटीत प्रवेश देण्यास मज्जाव केल्याचे सांगण्यात आले.
अनेक सोसायट्यांच्या व्यवस्थापन समित्या तपासणी पथकांना प्रवेश नाकारत आहेत. याबाबत पथकातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. औंधमध्ये डासांच्या पैदाशीस पोषक ठरलेल्या भूखंडाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या पथकालाही शेजारील सोसायटीने प्रवेश दिला नाही. अखेर स्थानिक नगरसेवकांच्या हस्तक्षेपानंतर प्रवेश मिळवावा लागला. मात्र, बहुतांश ठिकाणी पथकांना माघारी परतावे लागले आहे.- डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा, पुणे