

पुणे: आकाशात झेपावणारे रंगीबेरंगी रॉकेट, प्रकाशाची उधळण करणारे फोटो फ्लॅश, हवेत उडणारे हेलिकॉप्टर अन् पॅराशूट, तर जमिनीवर रंगांची बरसात करणारे फाऊंटन आणि गरगर फिरणारे भुईचक्र! अशा पारंपरिक आणि आधुनिक फटाक्यांच्या वैविध्यपूर्ण दुनियेमुळे यंदाची दिवाळी अधिकच रंगतदार ठरणार आहे.
शहरातील फटाक्यांचे स्टॉल्स सजले असून, दहा रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंतचे फटाके बाजारात दाखल झाले आहेत. विशेषतः कमी आवाज आणि कमी धुरात आकर्षक रोषणाई करणाऱ्या फटाक्यांच्या खरेदीकडे पुणेकरांचा कल दिसून येत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि मैदानांवर फटाक्यांचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. यंदा फोटो फ्लॅश, स्काय किंग, ड्रोन, हेलिकॉप्टर, पॅराशूट, बटरफ्लाय, कलर फाऊंटन आणि डिस्को व्हीलसारखे फॅन्सी फटाके ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आकाशात उंच झेपावल्यानंतर रंगीबेरंगी आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांना तरुणाईची विशेष पसंती मिळत आहे.
पारंपरिक फुलबाजे, भुईचक्र, लक्ष्मी बॉम्ब, रॉकेट आणि फटाक्यांच्या माळांनाही मागणी कायम आहे. सात ते २४० शॉट्सचे फटाके, तसेच एक हजार ते दहा हजार फटाक्यांच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
लहान मुलांसाठी पॉप-पॉप, टिक-टॅक आणि रंगीत फटाक्यांचे विविध प्रकार दाखल झाले आहेत. मुलांकडून नवनवीन फटाक्यांची मागणी होत असली, तरी पालकांकडून कमी आवाजाच्या फटाक्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे यंदा आकर्षक रोषणाई करणाऱ्या फॅन्सी फटाक्यांची चलती असल्याचे विक्रेते रोहन टिळेकर यांनी सांगितले.
फटाक्यांच्या बाजारात 'या' प्रकारांची क्रेझ!
आकाशातील आतषबाजी : मल्टिशॉट, कलर रॉकेट, व्हिसलिंग रॉकेट, स्काय किंग.
आकर्षक रोषणाई : फोटो फ्लॅश, कलर फाऊंटन, बटरफ्लाय, डिस्को व्हील.
नव्या प्रकारांचे आकर्षण : ड्रोन, हेलिकॉप्टर, पॅराशूट, फॅन्सी शॉट्स.
पारंपरिक फटाके : फुलबाजे, भुईचक्र, लक्ष्मी बॉम्ब, फटाक्यांच्या माळा.
चिमुकल्यांची पसंती : पॉप-पॉप, टिक-टॅक, रंगीत फटाके.
दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांकडून मोठ्या आवाजापेक्षा आकर्षक रोषणाई करणाऱ्या आणि तुलनेने कमी धूर निर्माण करणाऱ्या फटाक्यांची मागणी होत आहे. ड्रोन, हेलिकॉप्टर, फोटो फ्लॅश आणि मल्टिशॉटसारखे फॅन्सी फटाके विशेष आकर्षण ठरत आहेत. पारंपरिक फटाक्यांनाही मागणी कायम असून, लहान मुले आपल्या कुटुंबीयांसह खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
- राकेश चांदेकर,विक्रेते, विघ्नहर्ता फटाका मार्ट, धायरी.
तामिळनाडू येथील शिवकाशी, धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा आदी ठिकाणांहून फटाक्यांची आवक झाली आहे. यावर्षी आवाजी फटाक्यांसह ग्रीन क्रॅकर्स फटाक्यांनाही मागणी अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी फटाक्यांचे दर वाढलेले असले तरी मागणी अधिक आहे.
- विक्रांत मोहिते, फटाके विक्रेते, डेक्कन.