Death Pudhari
पुणे

Pune Dengue Deaths: पुण्यात डेंग्यूच्या आठ संशयित मृत्यूंची चौकशी; राज्यस्तरीय समितीकडून वैद्यकीय अहवालांची तपासणी

महापालिकेकडून आठ प्रकरणे आरोग्य विभागाच्या लेखापरीक्षण समितीकडे; मृत्यूंचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात चालू वर्षात आठ रुग्णांचा मृत्यू डेंग्यूमुळेच झाला की अन्य गंभीर आजारांमुळे, याचा शोध घेण्यासाठी महापालिकेने ही प्रकरणे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या लेखापरीक्षण समितीकडे पाठवली आहेत. वैद्यकीय नोंदींच्या छाननीनंतरच डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूंची अधिकृत संख्या स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काही रुग्णांची डेंग्यू चाचणी सकारात्मक आली असली, तरी अनेकांना अन्य गंभीर आजार असल्याने मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

या संशयित मृत्यूंमध्ये दि. १८ ऑक्टोबर रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये मृत्यू झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. याशिवाय कात्रज येथे तीन वर्षांचा मुलगा, गंज पेठेत ७५ वर्षीय पुरुष, ताडीवाला रोड येथे ५१ वर्षीय पुरुष, पिंपळे गुरव येथे ७४ वर्षीय महिला, येरवडा येथे नऊ महिन्यांचा मुलगा, छत्रपती संभाजीनगर येथील २४ वर्षीय रुग्ण आणि रत्नागिरी येथील ५३ वर्षीय पुरुष, अशा सात जणांच्या मृत्यूचीही चौकशी होणार आहे.

या रुग्णांना डेंग्यूचा संसर्ग झाल्याचा संशय असला, तरी त्यांच्या मृत्यूमागील कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल तपासले जाणार आहेत. काही रुग्णांचे डेंग्यूचे विशिष्ट निदान करणारे मार्कर्स निगेटिव्ह आले होते. त्यामुळे केवळ संशय किंवा प्राथमिक चाचणीच्या आधारे मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे निश्चित करता येणार नाही.

अनेकांना अगोदरच विकार

अनेक रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचे विकार, यांसारखे आधीपासूनचे आजार होते. काहींच्या वैद्यकीय नोंदींमध्ये डेंग्यू शॉक सिंड्रोम, अनेक अवयवांचे कार्य बिघडणे आणि अवयव निकामी होणे, अशा गुंतागुंती नमूद आहेत. त्यामुळे प्रत्येक मृत्यूमागील कारण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

चालू वर्षात आत्तापर्यंत डेंग्यूमुळे आठ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून, यातील तीन रुग्ण बाहेरील रहिवासी होते. केवळ उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे ज्या ठिकाणचे रुग्ण आहेत, तेथूनच प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT