Dengue Malaria Pudhari
पुणे

Pune Dengue Chikungunya Cases: पावसाळा संपतोय, तरी डास नियंत्रणाचे कर्मचारी कागदावरच

२६५ कर्मचारी तातडीने नियुक्त करा; स्थायी समितीचे प्रशासनाला आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना डास नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ अद्याप उपलब्ध झाले नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डास नियंत्रणासाठी प्रस्तावित २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती तातडीने पूर्ण करून रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांत त्यांना प्राधान्याने तैनात करा, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले.

यंदा शहरात आतापर्यंत डेंग्यूचे १८२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिकुनगुनियाचे १४ संशयित रुग्ण आढळले असून, सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषतः ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाल्याने डास नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भिमाले यांनी आढावा घेतला.

महापालिकेने डास नियंत्रणासाठी १५० कायमस्वरूपी पदे भरली आहेत. मात्र, मनुष्यबळ अपुरे असल्याने आणखी २६५ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. पावसाळा संपत आला तरी हे कर्मचारी प्रत्यक्ष कामावर रुजू झालेले नाहीत. पावसाळ्यापूर्वीच मनुष्यबळ उपलब्ध असणे अपेक्षित असताना नियुक्तीला विलंब का झाला आणि त्याला जबाबदार कोण, अशी विचारणा भिमाले यांनी केली.

दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थळे आढळल्याप्रकरणी वर्षभरात १७०८ नोटिसा बजावून दोन लाख ६५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कारवाईनंतरही रुग्णसंख्या वाढत असल्याने डास नियंत्रण मोहीम किती प्रभावी आहे, याचे मूल्यमापन करण्याची गरज आहे.

डेंग्यू-चिकुनगुनियाचे हॉटस्पॉट निश्चित करून उत्पत्तीस्थळे नष्ट करावीत. तसेच, सर्वेक्षण आणि फवारणीची विशेष मोहीम राबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश भिमाले यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT