Dengue Pudhari
पुणे

Pune Dengue Chikungunya Cases: डेंग्यू-चिकुनगुनियात पुणे आघाडीवर; मात्र डेंग्यूमुळे एकही मृत्यू नाही

राज्यातील रुग्णसंख्येत पुण्याची वरची नोंद; एनआयव्हीमध्ये थेट तपासणीमुळे अचूक निदान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभरात डेंग्यूचे 14,159 रुग्ण आढळले आहेत, तर चिकुनगुनियाच्या 3 हजार 439 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक डेंग्यू रुग्णसंख्येमध्ये धुळ्यापाठोपाठ पुण्याचा (44 रुग्णसंख्या) समावेश आहे. तर, राज्यात सर्वाधिक चिकुनगुनियाचे रुग्ण (22) पुण्यामध्ये नोंदविले गेले आहेत. मात्र, 2025 मध्ये राज्यात डेंग्यूमुळे जे 21 मृत्यू झाले आहेत, त्यातील एकही रुग्ण पुण्यात असल्याची नोंद झाली नाही.

पुण्याच्या जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. अपर्णा पाटील यांनी सांगितले की, पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे, जिथून रुग्णांचे नमुने थेट ‌‘एनआयव्ही‌’मध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. त्यामुळे तपासणी अधिक अचूक होते आणि चुकीचे निगेटिव्ह अहवाल येत नाहीत. प्रत्येक नमुन्याची डेंग्यू आणि चिकुनगुनिया दोन्हींसाठी तपासणी केली जाते.

बहुतांश रुग्ण मजूर आणि स्थलांतरित कामगारवर्गातील असून, हे रुग्ण विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. राज्यात सर्वाधिक डेंग्यू रुग्ण असलेले जिल्हे अनुक्रमे धुळे (58), पुणे (44), पालघर (20), लातूर (20) आणि जळगाव (18) आहेत. तर, चिकुनगुनियामध्ये पुणे (22), पालघर (18), धुळे (13) आणि जळगाव (6) हे जिल्हे आघाडीवर आहेत.

पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, गेल्या वर्षी शहरातील डेंग्यू रुग्णसंख्या 2024 च्या तुलनेत सुमारे एकतृतीयांशने कमी झाली आहेत. दीर्घकाळ टिकणारा पावसाळा, साचणारे पाणी आणि वेगाने वाढणारे शहरीकरण ही कीटकजन्य आजारांमागील प्रमुख कारणे आहेत.

मधुमेही, हाय बीपीच्या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे

कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे ताप, अंगावर पुरळ आणि तीव सांधेदुखी, अशी लक्षणे दिसत असून, बहुतांश रुग्णांना पाणी पिणे आणि मूलभूत उपचारांनी नियंत्रण मिळते. मात्र, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. आजार लवकर ओळखून तत्काळ उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT