Dengue Pudhari
पुणे

Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा कहर; ८ वर्षीय मुलीचा मृत्यू, चिमुकलीच्या उपचारानंतरही महापालिकेची फवारणी नाही!

आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर स्थायी समितीत संताप; आठ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश, अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी असलेला महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र निष्क्रिय असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. डेंग्यूमुळे आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे, तर टिंगरेनगरमधील वैभव कॉलनीतील अडीच वर्षांच्या चिमुकलीला आठ दिवस ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. एवढे होऊनही तिच्या घरी औषध फवारणीसाठी महापालिकेचा कर्मचारी पोहोचला नाही. या प्रकारामुळे गुरुवारी (दि.२२) स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आठ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिल्याची माहिती आहे.

नगरसेवक सुहास टिंगरे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा मुद्दा उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वीच डेंग्यूचा वाढता धोका लक्षात आणून देऊन उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र, औषध फवारणीचे कंत्राट संपल्याचे आणि मनुष्यबळ अपुरे असल्याचे कारण प्रशासनाने दिले.

आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू होऊनही यंत्रणा जागी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अडीच वर्षांच्या मुलीला डेंग्यू झाल्यानंतर आठ दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. तरीही तिच्या घरी फवारणी झाली नसल्याची तक्रार संबंधित महिलेने केली. टिंगरे यांनी या महिलेचा दूरध्वनीवरील संवाद सभागृहात ध्वनिक्षेपकावर ऐकवला. एकाच घरातील तिघांना डेंग्यूची लागण झाल्याचेही यातून समोर आले.

डासांची उत्पत्तीस्थळे वाढली; कारवाईचा अभाव

बांधकामे, रुग्णालये, स्विमिंग टँक आणि वाहन धुलाई केंद्रांमध्ये डासउत्पत्तीस्थळे आढळल्यास नोटिसा देऊन कारवाई केली का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. जनजागृतीचा अभाव आणि कीटक नियंत्रण विभागाच्या ढिसाळ कामकाजावरही स्थायी समितीत टीका झाली. कंत्राट संपले किंवा मनुष्यबळ कमी आहे, ही कारणे देऊन प्रशासनाला जबाबदारी झटकता येणार नाही. तातडीने फवारणी व डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा टिंगरे यांनी दिला.

डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

पावसाळ्यानंतर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रादुर्भाव अधिक जाणवत असल्याची माहिती आरोग्य विभागप्रमुख नीना बोराडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT