पुणे

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये सावकाराचा धक्कादायक कारनामा! लाखो रुपये वसूल करूनही पैशांसाठी तगादा; पोलीस ठाण्यातच महिलेला धमकी

सावकाराविरुध्द तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला धमकाविले

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन : येथे सावकाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेला सावकाराने पोलिसांसमोरच धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या वेळी पोलीस ठाण्यात गोंधळही झाला. या प्रकरणी प्रमोद उर्फ परमेश्वर मोहन मार्कड (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याच्याविरुद्ध सावकारी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. संबंधित महिला घरोघरी धुणी-भांडी करण्याचे काम करते. तिने प्रमोद याच्याकडून ८ फेब्रुवारी २०२५ रोजी ३ लाख १४ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रमोदने तिच्याकडून वेळोवेळी तब्बल १० लाख ८४ हजार रुपये वसूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

इतकी रक्कम दिल्यानंतरही तो महिलेकडे आणखी पैशांची मागणी करत होता. ‘तू मला एकटी भेट, तुला लागतील तर अजून पैसे देतो,’ असे सांगून तो महिलेला एकटीला भेटण्यासाठी बोलवत होता. तसेच, तो तिचा सतत पाठलाग करत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकाराला कंटाळून महिला प्रमोदविरुद्ध तक्रार देण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गेली. मात्र, तेथेही तिला धमकी देण्यात आली आणि पोलिसांसमोरच गोंधळ झाल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणी प्रमोद उर्फ परमेश्वर मार्कड याच्याविरुद्ध सावकारी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत परस्परविरोधी तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांसमोरच गोंधळ; भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली असताना तेथे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच गोंधळ झाल्याने पोलिसांनी परिस्थिती वेळीच नियंत्रणात का आणली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेलाच तेथे धमकी देण्यात आल्याने या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT