भिगवण : मदनवाडी येथील पुलाखालील गर्भवती महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत करून पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मृत महिलेच्या हातावरील रविराज या टॅटूवरून या खुनाला वाचा फुटली. पत्नीच्या अनैतिक संबंधावरून पतीनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. सुदर्शन उर्फ रविराज जाधव (वय ३६, रा. कटफळ, ता. बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर दीपाली रविराज जाधव (वय ३०) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविराज व पत्नी दीपाली हे कटफळ येथे राहत होते. मात्र पत्नीच्या अनैतिक संबंधावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती त्यातच दीपालीच्या पोटातील बाळावरून दि. १२ ऑक्टोबर रोजी वाद झाले आणि रविराज याने रागाच्या भरात दिपालीच्या डोक्यात लोखंडाने मारले व तिचा खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह चादरीत गुंडाळून तो स्कुटीवरून बारामती-राशीन मार्गावर असलेल्या मदनवाडी पुलावर आला व मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला होता.
दरम्यान बुधवारी (दि.२२) नागरिकांना दुर्गंधी आल्यानंतर व चादरीमध्ये काहीतरी झल्याची खबर पोलीस पाटील नानासाहेब वणवे यांनी भिगवण पोलिसांना देण्यात आली होती. याची खातरजमा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काळ्या चादारीत गुंडाळलेल्या अवस्थेत गर्भवती महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहाच्या हातावर रविराज हा टॅटू गोंदलेला होता. याबाबत भिगवण पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेची मिसिंग माहिती गोळा करत असताना रविराज यानेच आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार बारामती पोलीस ठाण्यात दि .१४ ऑक्टोबर रोजी दिली होती. याची माहीती हाती येताच तपास सुरू झाला. रविराज यांच्याकडे चौकशी करता त्यात विसंगती येऊ लागल्याने पोलिसांचा संशय बळावला व या खुनाचे रहस्य बाहेर आले.
ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भट्टे, स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संपकाळ, बाळकृष्ण कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, स्थानिक गुन्हा शाखेचे अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, अतुल डेरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, अजय देडे, भिगवण पोलीस स्टेशनचे सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा भांडवलकर, विठ्ठल वारगड, वर्षा जामदार, रणजीत मुळीक, मयूर बोबडे, पोलीस पाटील शामला पवार या पथकाने या खुनाचा उलगडा केला.