पुणे

Pune Crime News : बाप-लेकाला चाकूने भोसकले

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'शिवीगाळ का केली?' अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाला एकाने चाकूने भोसकल्याचा प्रकार टेल्को कॉलनी दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी संग्राम धुळुबा शिंदे (वय 48, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. गौरव नवनाथ कुलथे (वय 24) आणि त्याचे वडील या घटनेत जखमी झाले आहेत. हा प्रकार 11 फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास दत्तनगरमधील टेल्को कॉलनीतील गल्ली क्रमांक सातमध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहायला असून, एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने दोन महिन्यांपूर्वी त्याच्या गल्लीत दारू पिऊन गोंधळ घातला होता. त्या वेळी फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला रागावून समजावून सांगितले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना 11 फेब्रुवारीला दुपारी शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी त्याच्या वडिलांसह आरोपीकडे गेले होते.

त्या वेळी आरोपीने फिर्यादींच्या वडिलांना शिवीगाळ करीत 'तुला आता संपवूनच टाकतो' असे म्हणत, त्यांच्या पोटात एकापेक्षा जास्त वेळा चाकूने भोसकले. यात फिर्यादीचे वडील गंभीर जखमी झाले. फिर्यादी वडिलांना वाचविण्यासाठी मध्ये गेले असता, 'तुला पण तुझ्या बापासोबत आजच संपवून टाकतो' असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या पोटात चाकू खुपसला. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मोहन कळमकर याचा तपास करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT