मातेचे अश्रू अन् कर्तव्यनिष्ठा; चिमुकल्याचे अपहरण करणारे जेरबंद file photo
पुणे

Pune News: मातेचे अश्रू अन् कर्तव्यनिष्ठा; चिमुकल्याचे अपहरण करणारे जेरबंद

त्या क्षणी आरपीएफच्या जवानांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर नेहमीचीच लगबग होती, पण तो सोमवारचा (दि.23 जून 2025) दिवस रेल्वेच्या आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) साठी अविस्मरणीय ठरला. हा दिवस एका मातेच्या प्रार्थनेला मिळालेले उत्तर आणि एका निष्पाप चिमुकल्याच्या सुरक्षिततेचा विजय होता.

बिहारमधील हाजीपूरमध्ये एका मातेच्या काळजाचा तुकडा, तिचा अवघ्या सात महिन्यांचा लाडका चिमुकला बुधवारी (दि.18 जून 2025) अचानक बेपत्ता झाला. अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली आणि त्या मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला. (Latest Pune News)

तिचे अश्रू थांबत नव्हते, तिचा प्रत्येक श्वास आपल्या बाळाच्या आठवणींनी भरलेला होता. तेथील लोहमार्ग आणि स्थानिक पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला, पण बाळाचा पत्ता लागत नव्हता, आशा धुसर होत होती.

नियतीला काहीतरी वेगळेच हवे होते. पुणे विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला हाजीपूरमधील लोहमार्ग पोलिसांकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. अपहरणकर्ते पुणे रेल्वे स्थानकावर असण्याची शक्यता होती, ही माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ पुणे पोलिस ठाण्यातील निरीक्षक सुनील यादव व अन्य अधिकारी आणि जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानकावर शोधमोहीम सुरू केली.

चौकशी झाली सुरू

चौकशीदरम्यान, मुन्ना कुमार राजभर (वय 24) आणि पूनम देवी (वय 30) अशी त्यांनी आपली नावे सांगितली. पण त्यांच्याजवळील सात महिन्यांच्या बाळाबद्दल विचारले असता, ते दोघेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत आणि कोणतेही वैध कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.

आरपीएफच्या जवानांना खात्री पटली की, काहीतरी गडबड आहे. त्यांनी तत्काळ दोघांचे आणि त्या निरागस बाळाचे छायाचित्र जीआरपी (लोहमार्ग पोलिस) हाजीपूरला पाठवले. काही क्षणातच ओळख पटली. हे तेच अपहरणकर्ते होते आणि ते बाळ तेच होते, ज्याच्या शोधात हाजीपूरची पोलिस यंत्रणा होती..! त्या क्षणी आरपीएफच्या जवानांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटले. पूनम देवीला तत्काळ अटक करण्यात आली आणि सात महिन्यांच्या त्या चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

...अन् ते सापडले

स्थानकावरील प्रत्येक प्लॅटफॉर्म, प्रत्येक कोपरा, प्रत्येक प्रवेश आणि निर्गम मार्ग आरपीएफच्या जवानांनी पिंजून काढला. त्यांचे डोळे संशयित व्यक्तींचा शोध घेत होते, त्यांच्या नजरेत, मनात त्या बेपत्ता बाळाची प्रतिमा होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते आणि अखेर तो क्षण आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर एक पुरुष आणि एक महिला संशयास्पदरीत्या दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. आरपीएफ पथकाने तत्परता दाखवत त्यांना त्वरित ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले अन् ते सापडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT