पुणे

Pune Crime News : बांधकाम व्यावसायिकाच्या घरात 32 लाखांचा डल्ला

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेंजहिल रोड भोसलेनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर डल्ला मारून चोरट्यांनी लॉकरसह 9 लाखांची रोकड, सोने-चांदी, डायमंडचे दागिने, असा तब्बल 32 लाख 50 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. स्वयंपाकघराच्या खिडकीचे स्लायडिंग उचकटून बंगल्यात प्रवेश करून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. याप्रकरणी दीपक विलास जगताप (वय 52, रा. मिथिला बंगला, अशोकनगर, रेंजहिल रोड, भोसलेनगर) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत घडली. फिर्यादी जगताप हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचा अंशुल ग्रुप नावाने व्यवसाय आहे. पार्किंगसह त्यांचा चार मजल्यांचा बंगला आहे. 25 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजता जेवण झाल्यानंतर दरवाजा आणि खिडक्या बंद करून जगताप आणि त्यांचे कुटुंबीय तिसर्‍या मजल्यावरील खोलीत झोपले होते.

दरम्यान, दुसर्‍या दिवशी (दि. 26) दुपारी बारा वाजता नोकर दुसर्‍या मजल्यावर साफसफाई करीत असताना खोलीचा वॉर्डरोब तुटलेला असून, त्यातील दोन लॉकर चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने दुसर्‍या मजल्यावर जाऊन पाहिले असता, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच घरातील लॉकर आणि त्यामध्ये ठेवलेले दागिने, रोकड मिळून आली नाही.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बांधकाम व्यावसायिक जगताप यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT