Pune Crime News Pudhari
पुणे

Pune Crime News: पुण्यात भररस्त्यात तरुणीला उचलण्याचा प्रयत्न; नराधमाने नको त्या ठिकाणी स्पर्श केला, मैत्रीण मदतीला धावली अन्...

Pune Crime News: पुण्यातील सुखसागरनगर परिसरात १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

Rahul Shelke

Pune Crime News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तरुणीच्या आरडाओरडीनंतर तिची मैत्रीण आणि स्थानिक नागरिक मदतीला धावले. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी सुखसागरनगरमधील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपीने तिच्या छातीला हात लावून शर्ट ओढला आणि तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. तरुणीच्या मैत्रिणीने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले. यावेळी आरोपीने एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडला.

मैत्रीण वेळीच धावल्याने अनर्थ टळला

घटनेबाबत पीडित तरुणीने सांगितले की, ती मैत्रिणीची वाट पाहत असताना आरोपी अचानक तिच्याजवळ आला आणि तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचवेळी मैत्रीण तिथे पोहोचली आणि तिने आरोपीला ढकलले. तरीही आरोपीने तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याला पकडण्यात आले.

“आरोपीला मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्याला शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी पीडित तरुणीने केली. या प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज समोर; पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी, नागरिकांची वर्दळ असताना अशा प्रकारची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेत तरुणीच्या मैत्रिणीने आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT