Baramati bribe case : बारामती तालुक्यात वनपाल ACB च्या जाळ्यात; ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

शेतजमिनीत माती भरण्यावरून कारवाईची धमकी; माळेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Bribe News
Bribe News
Published on: 
Updated on: 

बारामती : पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनीतील माती वाहून गेल्याने ती भरून घेण्यास परवानगी देण्याच्या बदल्यात कारवाईची भीती दाखवून लाच स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. जहिर सिराज शेख (वय ४७, वनपाल, वर्ग-३, करंजे राऊंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बारामती; रा. रिसिका अपार्टमेंट, जिजाऊ मंगल कार्यालयाशेजारी, बारामती) असे लाचखोर वनपालाचे नाव आहे. माळेगाव येथे रविवारी (दि. २५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ६० वर्षीय शेतकरी असून, त्यांची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. नीरा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे त्यांच्या शेतातील माती वाहून गेली होती. त्यामुळे ते नदीपात्रातील गाळयुक्त माती शेतात आणून टाकत होते. मात्र, संबंधित वनपालाने २६ सप्टेंबर रोजी तक्रारदाराचे हे काम बंद पाडले. ही जागा वन विभागाच्या मालकीची असल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवून त्याने काम करण्यास मज्जाव केला.

शेतकऱ्याने काम सुरू ठेवण्यासाठी वारंवार विनंती केली असता, वनपाल जहिर शेख याने कारवाई न करण्यासाठी स्वतःकरिता व एका महिला सहकाऱ्यासाठी मिळून एकूण १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी ४ हजार रुपये त्याने त्याच दिवशी स्वीकारले होते. उर्वरित ६ हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरू न करण्याची ताकीद त्याने दिली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने २३ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता, संशयित वनपालाने १० हजार रुपयांपैकी ४ हजार रुपये आधी स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित ६ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर रविवारी माळेगाव येथे सापळा रचण्यात आला. माळेगाव आयटीआयसमोरील हॉटेल शिवकृपा येथे शेतकऱ्याकडून उर्वरित ६ हजार रुपयांची लाच घेताना वनपाल जहिर शेख याला पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण तावरे आणि वैशाली माकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news