Pune Crime: धक्कादायक! पुण्यात कॉफीच्या पाकिटांमधून 2 कोटी 61 लाखांच्या अमली पदार्थांची तस्करी Pudhari
पुणे

Pune Crime: धक्कादायक! पुण्यात कॉफीच्या पाकिटांमधून 2 कोटी 61 लाखांच्या अमली पदार्थांची तस्करी

मुंबईच्या महिलेला पुणे विमानतळावर अटक

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ड्रग तस्करीसाठी ड्रग तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. अशीच नावीन्यपूर्ण आयडिया ड्रग तस्करी करणार्‍या महिलेने लढवून थेट बँकॉक येथून कॉफीच्या पाकिटांमध्ये तब्बल 5 किलो 262 ग्रॅम मेथाक्वालोन हा तब्बल 2 कोटी 61 लाखांचा बंदी असलेला अमलीपदार्थ तस्करी केला. मात्र, वेळीच सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गुप्तचर यंत्रणेने हा प्रकार उघडकीस आणला.

याप्रकरणी मुंबईच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. फहेमिदा मोहम्मद साहिद अली खान (44, नयानगर, रहेजा हॉस्पिटल मार्ग, माहिम वेस्ट, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कस्टम विभागाच्या पोलिस निरीक्षक पलक यादव यांनी फिर्याद दिली आहे. दि. 18 सप्टेंबरला बँकाॅकवरून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान पुण्यात उतरले. विमानतळाच्या बाहेर पडत असताना विमातळावर असलेल्या गुप्तचर यंत्रणेच्या पथकातील काहींना फहेमीदाच्या हालचालींवर संशय आला.

त्यानंतर कस्टमच्या अधिकार्‍यांनी तिला रोखले. तपासणीसाठी उघडण्यात आलेल्या गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये कपडे, चॉकलेट्ससोबत 10 कॉफी पाकिटे सापडली. त्या कॉफीची साधी वाटणारी 9 पाकिटे कस्टम विभागाने फोडून पाहिली असता त्यामध्ये पांढर्‍या रंगाची पावडर कस्टम विभागाला आढळली.

किटद्वारे त्या पदार्थांची तपासणी केल्यानंतर तो पदार्थ भारतात प्रतिबंधित असलेला अमली पदार्थ मेथाक्वालोन असल्याचे कस्टम विभागाच्या लक्षात आले. लागलीच त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून या वेळी लपवून आणलेले 5234.70 ग्रॅम वजनाचा मेथाक्वालोनचा साठा जप्त करण्यात आला. पंचांसमक्ष आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह झालेल्या या कारवाईत फहेमीदाकडून तिचा पासपोर्ट, मोबाईल फोन आणि प्रवासाशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली.

सीमाशुल्क विभागाच्या निरीक्षक पलक यादव यांच्या नेतृत्वाखाली ही धडाकेबाज कारवाई पार पडली. त्यांना अधीक्षक अजय मलिक, निरीक्षक अभयकुमार गुप्ता आणि अधीक्षक मनीषा बिनॉय यांच्या पथकाने ही कारवाई केली. 19 सप्टेंबरच्या पहाटेच फहेमीदाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी तिच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT