

पणजी : क्राईम ब्रँचने मुरगाव येथे छापा टाकत ४३.२० कोटी रुपये किंमतीचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले. आतापर्यंतची गोव्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. महिनाभरापूर्वी क्राईम ब्रँचने ११.६७ कोटीचे हायड्रोपॉनिक ड्रग्ज जप्त केले होते.
४३.२० कोटींच्या ड्रग्जप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने निबू व्हिन्सेंट, रेश्मा वाडेकर, मंगेश वाडेकर (रा. सडा, वास्को) यांना अटक केली आहे. यातील रेश्मा आणि मंगेश हे पती-पत्नी आहेत. दोघांचेही क्रिमिनल रेकॉर्ड आहे. रेश्माला वेश्या व्यवसाय प्रकरणी तर मंगेशला एका बलात्कार प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. सध्या तो सडा येथील स्मशानभूमीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम करत होता. या प्रकरणात रेश्माचा ड्रग्ज खरेदीमध्ये सहभाग असावा तर ते विकण्यामध्ये पती मंगेश व निबू व्हिन्सेंट यांचा वापर करण्यात येणार होता.
अलीकडेच रेश्मा वाडकर थायलंडला जाऊन आल्याने या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे परदेशात असण्याची शक्यता पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी व्यक्त केली.हे ड्रग्ज चॉकलेट वेफर्स आणि कॉफीच्या छोट्या-छोट्या पॅकेटमध्ये भरून ठेवले होते. त्यातील पावडरचा वास घेतल्यानंतर घटनास्थळावर तत्काळ तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे उघड झाले. पॅकिंगवरून अनुभवी ड्रग्ज डीलरचा यात सहभाग असण्याची शक्यता राहुल गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.