पुणे

Pune Crime : व्यापाऱ्याच्या मुलाचे भरदिवसा अपहरण; पोलिसांच्या नाकाबंदीत सुखरूप सुटका, कापूरहोळ येथील थरारक घटना

Pune Kidnaping Crime : अपहरणकर्त्यांनी उसाच्या पिकांचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला

रणजित गायकवाड

वाल्हे : कापूरहोळ (ता.भोर) परिसर मंगळवारी (दि.३) अक्षरशः थरारून गेला. एका नामांकित व्यापाऱ्यांच्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होते;मात्र जेजुरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून काळ्या रंगांच्या (एक्स यु व्ही ७००) एम. एच. १२ एक्स इ ५३५३ या कारमधून युवकाला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले. हा प्रकार अचानक घडल्याने गावात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तर ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मदतीचा संदेश देण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी निरा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेऊर–निरा मार्गावर तात्काळ नाकाबंदी उभारली.नीरा औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक रविराज कोकरे हरिश्चंद्र करे, प्रसाद कोळेकर यांनी तातडीने कारवाई करत अपहरण करण्याचा मार्ग बंद केला.संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊर (ता.पुरंदर) कडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली.पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच चालकाने वेग वाढवला;मात्र अरुंद रस्ता आणि घाईगडबडीत कार शेजारील उसाच्या शेतात जाऊन कार अडकली.आणि परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले.

दरम्यान, अपहरणकर्त्यांनी उसाच्या पिकांचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला; यावेळी पोलिसांनी तत्परतेने कारमधून युवकाला बाहेर काढत त्याची सुरक्षित सुटका केली.यानंतर जेजुरी पोलीस दुरस्खेत्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.यानंतर युवकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तो सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

“पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केल्यामुळे मुलाची सुरक्षित सुटका शक्य झाली;आरोपींचा शोध सुरू आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.

दरम्यान, अपहरणा मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आर्थिक वाद, खंडणी की वैयक्तिक वैर या सर्व शक्यतांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि वाहनाच्या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या धाडसी कारवाईमुळे कापूरहोळ परिसराने सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी आरोपींच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT