Pune Crime | जमिनीच्या वादातून चुलत भावाला कारने चिरडले, कटात सहभागी असलेल्या भावासह मित्राला अटक
पुण्यात जमिनीच्या वादातून चुलत भावाला गाडीखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या चुलत भावासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.
उरुळी कांचन : भवरापूर (ता. हवेली) येथे जमिनीच्या वादातून चुलत भावालाच गाडीने चिरडल्याची घटना समोर आलीय. भांडणातून झालेल्या मारामारीत चुलत भावाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देऊन घरी दुचाकीवरून जाणाऱ्या चुलत भावाचा अपघात घडवून आणल्याची ही घटना आहे. वैद्यकीय तपासाणीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भाऊ जात असताना कारने पाठीमागे जोरदार धडक देऊन खून केल्याची ही घटना सोमवारी (दि.२ मार्च) रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिसांनी चुलत भावासह कटात सहभागी असलेल्या त्याच्या मित्राला अटक केली आहे.
महेश लक्ष्मण साठे (वय ३२, रा. भवरापूर , ता. हवेली, जि.पुणे ) असे अपघात घडवून खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय दशरथ साठे (वय ३२ रा. भवरापूर ता. हवेली जि. पुणे ), गोकुळ नाना कोकरे (वय २३ रा. आष्टापूर ता. हवेली जि पुणे ) असे खून करणाऱ्या दोघांची नावे आहेत. तर याप्रकरणी मयताचे वडील लक्ष्मण सोपान साठे (वय ५८ , रा. भवरापूर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महेश साठे आणि आरोपी अक्षय साठे यांचे जमिनीवरून वाद आहेत. गट क्र. १०४ या शेतीच्या जुन्या वादाचे कारणावरून तसेच सामायिक नदीवरील मोटार दुरूस्तीच्या कारणावरून महेश साठे व त्यांचे चुलत भाऊ अभिषेक दशरथ साठे याचे भांडण झाले. या भांडणचा राग मनात धरून अभिषेक दशरथ साठेचा सख्खा भाऊ अक्षय दशरथ साठे व त्याचा साथीदार गोकुळ कोकरे याने मारहाणी तक्रार दाखल केली.
वैद्यकीय तपासणीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उरुळीकांचन - भवरापूर रस्त्याने घरी जात असताना आरोपी अक्षयने आपल्याकडे असणाऱ्या मोटारीने ( MH१२QY७८८८) मयत महेश साठे यांच्या मोटरसायकला (MH१२CJ९५५१) जोरात पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या थारोळ्यात पडून तो जागीच ठार झाला आहे.
दरम्यान, रात्री उशिरा महेश साठे याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी एनसी दाखल
सख्खा चुलत भावाला बेदकारपणे कारने धडक देऊन खून घडवून आणणारा अक्षय साठे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण आहे. मनगटाशाहीच्या बळावर दादागिरी करणे, मारामारी करणे अशी कृत्यांची चर्चा परिसरात होती. दादागिरीच्या बळावरच तो त्याचा चुलत भाऊ महेश व त्यांच्या कुटूंबावर दहशत माजवित होता. यापूर्वी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध जमीनीच्या वादातून मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात एनसी दाखल झाली आहे.

