Foreign women rescued from Pune spa
पुणे: मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि युनिट चारच्या पथकाने विमानतळ परिसरात संयुक्त कारवाई केली.
या वेळी चार विदेशी तरुणींसह पाच जणांची सुटका करण्यात आली आहे. ’व्हिक्टोरिया थाई स्पा’ या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन स्पा मॅनेजर आणि एका स्पा चालक मालकाविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
विमानतळ परिसरातील ईडन पार्क बिल्डिंगमधील सहाव्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान विमानतळ भागात मसाजच्या आड पुरुष ग्राहकांना मुली पुरवून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार संबंधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने येथून एका स्थानिक तरुणीसह चार परदेशी अशा पाच तरुणींची सुटका केली.
तर, दोघा स्पा मॅनेजर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजय राणे, अंमलदार तुषार भिवरकर, अमेय रसाळ, ईश्वर आंधळे, वैशाली खेडेकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.