पुणे: हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचा हंगाम सुरू झाल्याने पुणेकरांची पावले देशी सफरचंदाच्या खरेदीकडे वळू लागली आहेत. बाजारात देशी सफरचंद दाखल होताच परदेशातून येणार्या सफरचंदाचे दरही आवाक्यात येऊ लागले आहेत. घाऊक बाजारात देशी सफरचंदाच्या 12 ते 25 किलोच्या पेटीस 1800 ते 3600 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात सफरचंदाची 170 ते 200 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. परदेशीच्या तुलनेत देशी सफरचंद ताजी अन् स्वस्त
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात वॉश्गिंटन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होते. शीतगृहात साठवणूक केलेले हे सफरचंद मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी आणले जातात. (Latest Pune News)
त्याचा वाहतूक खर्च आणि साठवणूक खर्च अधिक असल्याने त्यांचे किरकोळ बाजारात येईपर्यंतचे दर वाढतात. मात्र, भारतीय सफरचंद दोन ते तीन दिवसांनी थेट बाजारात येतात आणि त्यांचा वाहतूक खर्च
हा परदेशी सफरचंदाच्या मानाने कमी असल्याने बाजारात त्यांचे दरही कमी असतात.आरोग्यासाठी अधिक गुणकारी समजली जाणारी अन् देशासह परदेशातून शहरातील बाजारातपेठेत दाखल होणारे सफरचंद लहानांपासून ज्येष्ठांच्या आवडीचे फळ. सफरचंदाचे गुणधर्म आणि त्याच्या मागणीचा विचार करता बाजारात वर्षभर सफरचंद पाहायला मिळतात. मात्र, पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा मुख्य हंगाम असतो.
सध्या हिमाचल प्रदेशातून सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होऊ लागले आहेत. रविवारी येथील फळबाजारात 18 ते 25 किलोच्या 480 बॉक्सची आवक झाली. घाऊक बाजारात एका पेटीला 1800 ते 3600 रुपये भाव मिळाला. देशी सफरचंदाचा हंगाम सुरू होताच सर्व प्रकारच्या सफरचंदाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे व्यापारी वर्गाकडून नमूद करण्यात आले.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस अगोदर हंगाम सुरू झाला आहे. पहिल्याच दिवसापासून सफरचंदाला चांगली मागणी आहे. दिवाळीपर्यंत भारतीय सफरचंदाचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू ही आवक आणखी वाढेल. त्यानंतर सफरचंदाचे दर आणखी खाली येतील. यंदा उत्पादनही चांगले असल्याचे चित्र आहे.
- गोरक्षनाथ हजारे, सफरचंदाचे व्यापारी