पुणे

Pune Crime : पत्नी-सासूच्या त्रासामुळे 24 वर्षांच्या अक्षयने आयुष्य संपविले

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय विजय साळवे (वय 24, रा. गणेशनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून, ती पोलिसांना मिळाली आहे.

याप्रकरणी पत्नी दीपाली अक्षय साळवे (वय 24), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अक्षय याची आई लक्ष्मी विजय साळवे (वय 52) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास सांगितले. वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने 19 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक शीतल दळवी तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT