पुणे: गुरुवारी (दि. २६) सकाळी न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने न्यायालयात पोहोचलो. एरवी सहजपणे प्रवेश करून न्यायाधीशांच्या दालनापर्यंत पोहोचता येत होते. मात्र, आज प्रवेशद्वारावरील चित्र बदलले होते.
पोलिसांकडून नागरिकांची तसेच त्यांच्या बॅगांची कसून तपासणी करण्यात येत होती. एकीकडे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसत होते, तर दुसरीकडे वकिलांच्या सुरक्षा तपासणीबाबत वेगळे निकष अवलंबले जात असल्याचे जाणवले.
मुंबई उच्च न्यायालयासह मुंबईतील विविध न्यायालयांमध्ये वकिलांचीही सुरक्षा तपासणी केली जाते, मग पुण्यातही सर्वांसाठी समान निकष का नसावेत, अशी चर्चा यानिमित्ताने गुरुवारी वकिलांमध्ये रंगली होती.
न्यायालय परिसरात एका व्यक्तीवर जीवघेण्या हल्ल्यानंतर 'पुढारी'च्या प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत सुरक्षा व्यवस्थेत बदल झाल्याचे दिसले; मात्र, सुरक्षेतील त्रुटी अद्याप कायम असल्याचेही प्रकर्षाने जाणवले.
जिल्हा न्यायालयाला एकाच महिन्यात तीनदा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. त्यापाठोपाठ न्यायालय परिसरात जीवघेणा हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस आयुक्तांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सुरक्षा तपासणीला गती मिळाली.
एरवी प्रवेशद्वारावर पोलिस कर्मचारी तैनात असूनही तपासणीबाबत फारसा आग्रह धरला जात नव्हता. मात्र, गुरुवारी पोलिसांकडून तपासणीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले. प्रवेशद्वारांवरील पोलिसांच्या कामकाजात बदल जाणवत होता.
मात्र, आधुनिक सुरक्षा उपकरणांची पुरेशी जोड नसल्याने पोलिसांना उपलब्ध साधनसामग्रीवरच अवलंबून राहावे लागत होते. न्यायालयात दररोज होणारी हजारो नागरिकांची वर्दळ लक्षात घेता अत्याधुनिक तपासणी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
न्यायालयाच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक घटकाची आहे. वकील, पक्षकार, कर्मचारी आणि नागरिक यांच्या सुरक्षा तपासणीसाठी निश्चित कार्यपद्धती असण्याची गरज आहे.
मुंबईतील न्यायालयांच्या धर्तीवर पुण्यातही सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत वकिलांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, मेट्रोच्या कामासाठी न्यायालय परिसरातील संरक्षक भिंतीचा काही भाग पाडला होता.
परंतु मेट्रोची वाहतूक सुरू होऊनही कायमस्वरूपी संरक्षक भिंतीचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. न्यायालयाच्या सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून हा प्रश्न निकाली काढण्याची आवश्यकता आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याची गरज
न्यायालय परिसरावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. उपलब्ध कॅमेऱ्यांची तांत्रिक तपासणी करून ते सुरू करणे, आवश्यकतेनुसार अतिरिक्त कॅमेरे बसवणे तसेच चित्रीकरणावर नियमित देखरेख ठेवण्याची व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
गंभीर घटना घडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क होते. काही दिवस तपासणीचा आग्रह धरला जातो. मात्र, कालांतराने परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी होऊ नये, यासाठी नियमित सुरक्षा ऑडीट आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे.
सुरक्षा सक्षम करण्यासाठी काय करावे?
मेट्रोस्थानकांच्या धर्तीवर बॅगा तपासण्यासाठी एक्स-रे बॅगेज स्कॅनर बसवावेत.
व्यक्तींच्या तपासणीसाठी अत्याधुनिक बॉडी स्कॅनर उपलब्ध करावेत.
प्रवेशद्वारांवर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर कार्यान्वित करावेत.
पोलिसांना तपासणीसाठी हँड हेल्ड मेटल डिटेक्टर उपलब्ध करून द्यावेत.
न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णक्षमतेने कार्यान्वित करावी.
मंजूर पदांनुसार पुरेसे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.
न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर घटना घडल्यानंतरच ऐरणीवर येता कामा नये. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांच्या सुरक्षेसाठी पुरेसे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासह आधुनिक तपासणी यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. बंद सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर तातडीने सुरू करून कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारावी. सुरक्षेतील सातत्य महत्त्वाचे आहे.- ॲड. संतोष खामकर, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन.