पुणे : स्वतःच्या घरात आयुष्यभर केलेल्या कष्टांचे चीज न होता, सुनेच्या वागणुकीने तिचा सासुरवास वृद्धापकाळातही सुरूच राहिला. घरकामे करून घेणे, वारंवार उपाशी ठेवणे तसेच मानसिक छळाचा कंटाळा आल्याने 80 वर्षीय वृद्धेने अखेर धैर्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
न्यायालयानेही तिच्या बाजूने निकाल देत दोन महिन्याच्या आत महिलेला दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या न्यायालयाने मुलगा आणि सुनेला हे आदेश दिले आहेत.
रोहित आणि प्रिया (नावे बदलेली आहेत) अशी वृद्धेच्या मुलगा आणि सुनेची नावे आहेत. त्या दोघांचाही घटस्फोट झाला असून, दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. लग्नानंतर तिघेही एकाच घरात राहत होते. काही महिन्यानंतर सुनेची वृद्ध सासूबद्दलची वागणूक बदलली. वृद्ध महिलेला संधिवात, ऑस्टियोपोरोसिस, पायात फ्रॅक्चर, गुडघ्यात समस्या असे आजार असूनही, ती घरातली सर्व कामे करत होती.
तरीही सून कायम सासूला घालून पाडून बोलायची. मुलगा आणि सून दोघेही तिची काळजी घेत नव्हते. सून तिला जेवण द्यायची नाही, उपाशी ठेवायची. हे घर माझे आहे, तू निघून जा, असे ती सासूला म्हणायची. सुनेकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून वृद्ध सासूने सुनेविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, वृद्ध सासू ठाण्याला मुलीच्या घरी गेली. तिथून परतल्यावर वृद्ध महिलेने ॲड. स्मिता देशमुख यांच्यामार्फत मुलगा आणि सुनेविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात दावा दाखल केला.
न्यायालयात सुनावणीदरम्यान वृद्ध महिलेने उतरत्या वयातील शेवटची संध्याकाळ आणि शेवटचा श्वास माझ्या घरी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर, न्यायालयाने देखील हे वृद्ध महिलेचे घर आहे, तिने तिथेच राहावे असे सांगत मुलाने व सुनेने निघून जावे अशा शब्दांत दोघांना फटकारले. वृद्ध महिलेला कोणताही त्रास देऊ नये. घरगुती हिंसाचाराच्या कृत्यांमुळे झालेल्या दुखापतींसाठी 2 महिन्यांच्या आता तिला मुलगा आणि सुनेने प्रत्येकी 2 लाख रुपये द्यावेत असा आदेश दिला. त्यामुळे, वृद्ध महिलेला दिलासा मिळाला आहे.