Divorce Pudhari
पुणे

Pune Mutual Divorce Case: पुण्यात आयटी इंजिनिअर व महिला पोलिस अधिकाऱ्याचा परस्पर संमतीने घटस्फोट

कूलिंग पीरियड माफ; कौटुंबिक न्यायालयाने एका दिवसात दिला निकाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रेमाच्या नात्यातून विवाहबद्ध आणि उच्चशिक्षणामुळे करिअरमध्ये स्थिरस्थावर झालेल्या दाम्पत्याचा संसार अखेर अटींवरच संपुष्टात आला. आयटी क्षेत्रातील तरुण आणि महाराष्ट्र पोलिस दलातील महिला अधिकारी असलेल्या दाम्पत्याने समुपदेशनानंतर परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला.

पती-पत्नीमध्ये पुनर्मिलनाची शक्यता नसल्याचे आणि समुपदेशनानंतर सर्व वाद मिटल्याचा अर्ज वकिलांनी दिल्यानंतर न्यायालयाने ‌‘कूलिंग पीरियड‌’ माफ करत त्यांचा अर्ज अवघ्या एका दिवसात मंजूर केला. मृण्मयी आणि तेजस (नावे बदललेली) यांचा 2021 साली ‌‘लव्ह विथ ॲरेंज‌’ पद्धतीने विवाह झाला होता.

शालेय जीवनापासून एकमेकांची ओळख असलेल्या या दोघांची शाळेच्या गेट-टुगेदरमध्ये पुन्हा भेट झाली. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने ते विवाहबद्ध झाले. दरम्यान, काही काळातच दोघांमध्ये मतभेद उफाळून येऊ लागले. विचारसरणीतील तफावत, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, करिअरला प्राधान्य आणि विशेषतः मूल होण्याबाबतचे मतभेद यामुळे दोघांमध्ये वाद वाढू लागले.

कोणत्याही मुद्द्‌‍यावर एकमत होत नसल्याने नात्यात ताण निर्माण झाला. परस्परांबद्दल संशयाची भावना वाढून संवाद कमी झाला. त्यामुळे दोघांनी जानेवारी 2023 पासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात कुटुंबीय, मित्रमंडळीने समेटाचे प्रयत्न केले. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. अखेर, ॲड. संग््रााम जाधव यांनी दोघांचेही समुपदेशन केले. त्यानंतर दोघांनीही परस्परसंमतीने नातेसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्त्रीधन, पोटगी, भविष्यातील कोणताही हस्तक्षेप न करणे यांसह सर्व मुद्द्यांवर स्पष्ट सहमती दिली. त्यानुसार ॲड. जाधव यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्परसंमतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. न्यायालयाने तो मान्य करत एका तारखेमध्ये दोघांचा घटस्फोट मंजूर केला.

पती-पत्नीमध्ये पुनर्मिलनाची कोणतीही शक्यता उरलेली नसल्यास तसेच भरणपोषण, स्त्रीधन, मालमत्ता, मुलांचा ताबा अशा सर्व बाबींवर परस्परसहमती झाल्यास सहा महिन्यांचा ‌‘कूलिंग पीरियड‌’ अनिवार्य राहत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. अशा परिस्थितीत विलंब केल्यास केवळ मानसिक ताण वाढतो. त्यामुळे न्यायालयाने विवेकाधिकार वापरत हा कालावधी माफ करून घटस्फोट जलदगतीने निकाली काढण्याची मागणी आम्ही केली व ती न्यायालयाने मंजूर केली.
ॲड. संग््रााम जाधव, दाम्पत्यांचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT