पुणे: उच्चभ्रू सोसायटीत थाटलेल्या हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी कारवाई करून पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी हुक्का पॉट व साहित्य, तसेच विविध प्रकारच्या हुक्का फ्लेवर्सनी भरलेले चिलीम असा 12 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धनकवडीतील श्री गुरुनानक कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर हे हुक्का पार्लर सुरू होते.
राजनसिंग भजनसिंग गोरोवाडा (वय 35, रा. राजमुद्रा सोसायटी, धनकवडी), पारस परमानंद शर्मा (वय 24), सुभाष मानसिंग गिरी (वय 20), तिलक भोला तिवारी (वय 35), नारायण मेघे आचार्य (वय 34, रा. सर्व मूळ नेपाळ, सध्या गुरुनानक कृपा बिल्डिंग, राजमुद्रा सोसायटी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी, आरोपींच्या विरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजसिंग याच्या मालकीची धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत गुरुनानक कृपा नावाची बिल्डिंग आहे. तेथे तो मुलांचे खासगी वसतिगृह (पिजी) चालवितो. त्याच इमारतीच्या टेरेसवर त्याने हे हुक्का पार्लर थाटले होते.
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहकारनगर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस हवालदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की, धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटीतील मेहेर लिव्हिंग बिल्डिंगशेजारील श्री गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर अवैध हुक्का पार्लर सुरू आहे.
त्यानुसार पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कर्चे, कर्मचारी नीलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, महेश भगत, अमोल पवार यांच्या पथकाने बिल्डिंगमध्ये छापा टाकला. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चार टेबलांवर आठ व्यक्ती हुक्कासेवन करताना दिसून आले. काऊंटरवर असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली. हुक्का पार्लर चालविणारा मालक आणि कामगार अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच हुक्क्याचे साहित्य देखील जप्त केले. शहरात हुक्का पार्लरवर पोलिसांनी यापूर्वी देखील मोठी कारवाई केली आहे.