Sanitation Workers Protest Pudhari
पुणे

Pune Sanitation Workers Protest: पुण्यात सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा; दिवाळीपूर्वी प्रोत्साहनभत्ता देण्याची मागणी

बोनस बंद झाल्याने दरमहा १,७५० रुपयांचे नुकसान; महापालिका स्थायी समितीच्या निर्णयाकडे कंत्राटी कामगारांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करीत पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी (दि. २७) महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

बोनस कायद्यातील वेतनमर्यादेमुळे बोनस बंद झाल्याने कामगारांचे दरमहा १,७५० रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी बोनसच्या समतुल्य किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा प्रोत्साहनभत्ता दिवाळीपूर्वी द्यावा, अशी मागणी युनियनने केली. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून, प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय स्थायी समितीत होईल, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.

केंद्र सरकारच्या बोनस कायद्यानुसार २१ हजार रुपयांची वेतनमर्यादा ओलांडल्याने कंत्राटी कामगारांचा बोनस बंद झाला आहे. यापूर्वी वेतनात दरमहा बोनसची रक्कम दिली जात होती. यासंदर्भात युनियनने प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून महापौर, उपमहापौर, सर्वपक्षीय नेते, आयुक्त आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. दि. ९ सप्टेंबर आणि १६ ऑक्टोबरच्या बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा होऊनही निर्णय न झाल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे.

सन्मानाची वागणूक मिळावी...

युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी कंत्राटदारांकडून कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला. कंत्राटातील अटींचे पालन होत नसून, काही ठेकेदारांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही, तसेच नव्याने भरती झालेल्या कामगारांची खातीही उघडलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कामगारांना घरी बसविणे आणि रोजगाराचा हक्क हिरावून घेणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यापूर्वीच्या संघर्षानंतर घरभाडे भत्ता, रजावेतन आणि बोनस देण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला होता, असे युनियनने नमूद केले. या आंदोलनात कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे, वैजीनाथ गायकवाड, करुणा गजधनी, दिलीप कांबळे, सिद्धार्थ प्रभुणे, जयश्री भिसे, शोभा बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले. प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT