पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या 10 वर्षांत शहराची पाण्याची तहान तब्बल 6 टीएमसीने वाढली आहे. महापालिकाहद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या याच्या आधारे शहराची 72 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराला आता 20.90 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. याबाबत महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक (वॉटर बजेट) जलसंपदा विभागाला सादर केले आहे.
शहरातील नागरिकांना खडकवासला
धरण प्रकल्पातील चार धरणांमधून पूर्वीपासून पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागासोबत महापालिकेचा 2001 मध्ये 11.50 टीएमसी पाण्याचा करार झाला आहे. गेल्या वर्षांपासून भामा आसखेड धरणातील 2.65 टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. पण, शहराची लोकसंख्या वाढत असताना 20 वर्षांपूर्वी केलेल्या करारात बदल झालेला नाही. महापालिकेसाठी आवश्यक वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आले आहे. यासाठी पालिकेकडून 2019 मध्ये आधार नोंदणी व इतर साधनांव्दारे माहिती संकलित करण्यात आली असून, शहराची लोकसंख्या एकूण 52 लाख 8,444 इतकी निश्चित झाली होती.
यानुसार 2022-23 च्या पाण्याच्या अंदाजपत्रकामध्ये 2019 च्या लोकसंख्येमध्ये प्रतिवर्ष वार्षिक 2 टक्के वाढ गृहीत धरून, तसेच पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांची लोकसंख्या, तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांची लोकसंख्या गृहीत धरून 69 लाख 41 हजार 460 इतक्या लोकसंख्येसाठी 35 टक्के पाणीगळतीसह 2022-2023 साठी एकूण 20.34 टीएमसी एवढे पाण्याचे अंदाजपत्रक देण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाने 12.41 टीएमसी पाणी मंजूर केले होते. आता 2023-24 मध्ये 2022-2023 च्या लोकसंख्येमध्ये 2 टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे.
त्यानुसार 56 लाख 37 हजार 785 या लोकसंख्येस 150 एल.पी.सी.डी. प्रमाणे सन 2023-24 साठी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या 8 लाख 16 हजार लोकसंख्येकरिता 70 एल.पी.सी.डी. प्रमाणे व नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांची लोकसंख्या 2 लाख 98 हजार 714 करिता 70 एल.पी.सी.डी. प्रमाणे मागणी करण्यात आलेली आहे. शहर, समाविष्ट गावे, व्यापारी पाणी वापर, पाणीगळती 35 टक्केसह एकूण 20.90 टीएमसी पाण्याची मागणी 2023- 24 करिता नोंदविण्यात आली आहे.
हे ही वाचा :