पुणे: शहरात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ अर्थात मद्यपान करून वाहन चालविणार्यांवर पुणे शहर वाहतूक शाखेकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जानेवारी ते एप्रिल 2025 या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1700 मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
मात्र, तरीही पुण्यातील मद्यपी वाहनचालक सुधारायचे नावच घेत नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिस, आरटीओ पुणे, पुणे पोलिस यांनी अशा बेधुंद मद्यपींवर कारवाईसाठी कठोर पावले उचलण्याची अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. (Latest Pune News)
पुण्यातील सदाशिव पेठ, पेरूगेट पोलिस चौकीजवळ शनिवारी (दि. 31) सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने एमपीएससीचा अभ्यास करणार्या सात ते आठ विद्यार्थ्यांना टपरीवर चहा पित असताना उडविले. त्यात हे विद्यार्थी जखमी झाले. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वाहतूक शाखेचे प्रमुख पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याशी दै. ’पुढारी’च्या प्रतिनिधीने संवाद साधला.
या घडलेल्या अपघाताचा हवाला देत त्यांना त्यांच्याकडून पुण्यामध्ये ’ड्रंक अँड ड्राइव्ह’संदर्भात आत्तापर्यंत काय कारवाई करण्यात आली, झालेल्या कारवाया कशा प्रकारे केल्या जात होत्या, या कारवायांचे नियोजन कसे केले जाते, असे असतानाही रविवारी मद्यपीचालकाकडून असा भीषण अपघात कसा झाला, यासंदर्भात दै. ’पुढारी’च्या प्रतिनिधीने पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली.
त्या वेळी त्यांनी जानेवारी ते एप्रिल 2025 या चार महिन्यांच्या काळात पुणे शहर वाहतूक शाखेने तब्बल एक हजार 700 मद्य प्राशन करून वाहन चालविणार्या वाहनचालकांवर कारवाई केल्याचे सांगितले.
आठवड्यातून तीन रात्री होते ‘ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम’
आठवड्यातून तीन दिवस, विशेषतः शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागांमध्ये ब्रेथ अॅनालायझर तपासणीच्या माध्यमातून ही ’ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईची मोहीम आम्ही राबवत आहे. ही कारवाई दर आठवड्याला होत असते, असे पोलिस उपायुक्त झेंडे यांनी सांगितले. असे असले तरी ही कारवाई दिवसाही करावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.
नवीन वर्षांत पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मद्यपान करून वाहन चालविल्याने अपघातांची शक्यता वाढते आणि यामुळे निष्पाप लोकांचे प्राण धोक्यात येतात. त्यामुळे वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिल 2025 या चार महिन्यांच्या काळात तब्बल एक हजार 700 मद्य प्राशन करून वाहन चालविणार्या चालकांवर कारवाई केली आहे. आम्ही आठवड्यातून तीन दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्रीच्या वेळी संपूर्ण शहरात ब्रेथ अॅनालायझर मशिनच्या माध्यमातून ही कारवाई करत आहोत. या कारवाईचे नियोजन अतिशय कठोरपणे केले जात आहे; जेणेकरून शहरात सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करता येईल.- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
पुण्यातील सदाशिव पेठ, पेरूगेट पोलिस चौकीजवळ एका मद्यधुंद कारचालकाने एमपीएससीचा अभ्यास करणार्या सात ते आठ विद्यार्थ्यांना उडविल्याच्या घटनेनंतर ’ड्रंक अँड ड्राइव्ह’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस कारवाई करत असले, तरी अजूनही काही मद्यपी सुधारताना दिसत नाहीत. अशा बेजबाबदार वाहनचालकांमुळे इतरांचा जीव धोक्यात येतो. प्रशासनाने यावर आणखी कठोर पावले उचलून अशा लोकांवर कायद्याचा बडगा उगारणे गरजेचे आहे.- कुणाल चव्हाण, वाहनचालक