Pune Cleanliness Drive 2025
पुणे: शहरात कचर्याचा प्रश्न गंभीर आहे. कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने नव नियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी नाराजी व्यक्त करत शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी शनिवारी (दि.5) शहरात विविध भागात प्रत्यक्ष पाहणी करत पुण्यातील प्रश्न समजून घेतले. या वेळी त्यांनी सकाळी तसेच रात्रीसुद्धा शहरात स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता स्वच्छता कर्मचार्यांची रात्रपाळी सुरू होणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहराची पाहणी केली. या पाहणी दौर्यात महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख देखील उपस्थित होते. आयुक्तांनी सकाळी 6 वाजता शहराच्या पाहणीला सुरुवात केली. त्यांनी कॅम्प, पुणे स्टेशन, कसबा पेठ, शनिवार वाडा, विद्यापीठ परिसर, औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण, डेक्कन आदी भागात पाहणी केली. (Latest Pune News)
महापालिकेचे यंत्रणा कशी काम करते याची देखील या दौर्यात आयुक्तांनी पाहणी केली. शहरातील रस्ते, पदपथ रस्त्यावरील कचरा, अनधिकृत होर्डिंग, अनावश्यक विद्युत पोल, पाणी साठणारी ठिकाणे, राडारोडा, अनावश्यक ड्रेनेज व पाणीपुरवठ्याचे पाईप यांची पाहणी करत नागरिक रस्त्यावर कचरा फेकणार नाही, याबाबत अधिकार्यांना आयुक्तांनी सूचना केल्या. तसेच यापुढे दिवसा व रात्री देखील शहर स्वच्छ करण्याच्या सूचना नवल किशोर राम यांनी दिल्या.
सामूहिक पध्दतीने काम करा; शहर स्वच्छ ठेवा
शहरातील विविध समस्यांचा आढावा या वेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला. शहराची स्वच्छता कशी केली जाते ? याबाबतची यंत्रणा काय, हे देखील आयुक्तांनी समजून घेतले. यानंतर रात्रीच शहर स्वच्छ झाले पाहिजे, असे सांगत यापुढे रात्री देखील शहराची स्वच्छता केली जावी, असे आदेश आयुक्तांनी दिले. विभागप्रमुखांनी आपल्या कामाची जबाबदारी दुसर्या विभागांवर न ढकलता सामूहिक पध्दतीने शहर स्वच्छ ठेवावे, अशा सूचना देखील या वेळी नवल किशोर राम यांनी दिल्या.
कामात टाळाटाळ करणार्यांवर होणार कारवाई
पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांनी शहरातील नागरिक सकाळी झोपेतून उठण्यापूर्वीच शहर स्वच्छ करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास या पाहणीत आढळले. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता कर्मचार्यांची रात्रपाळी सुरू केली जाणार असून शहरात रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत स्वच्छतेची कामे करावी लागणार आहेत. जे कामात कुचराई करतील त्यांना थेट नोटिसा पाठवल्या जाणार आहेत.
महापालिका आयुक्तांच्या पाहणीनंतर त्यांनी रात्री शहर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार तत्काळ 200 आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली असून सर्व यंत्रणेला आयुक्तांच्या सूचनांनुसार वेगाने काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत एक टीम शहरात स्वच्छतेची कामे करणार आहे.- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका.
स्वच्छतेच्या बाबतीत पुण्याला देशात पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. त्यामुळे शहर योग्य पद्धतीने स्वच्छ होणे गरजेचे आहे. यासाठी घनकचरा विभागाच्या यंत्रणेने चांगले काम करणे अपेक्षित आहे. स्वच्छता कर्मचार्यांनी वेळेवर कामावर हजर राहून शहराची स्वच्छता करावी. या कामात इतर विभागांनी देखील जबाबदारीने काम करावे. या पाहणीत रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे समोर आले असून अशांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवसा शहर स्वच्छ होत नसल्याने रात्रीच शहर स्वच्छ करायला हवे. त्यामुळे तसे आदेश देण्यात आले आहेत.- नवल किशोर राम, बआयुक्त, पुणे महापालिका.