धनकवडी: राजमाता भुयारीमार्ग ते चंद्रभागानगर चौकादरम्यानच्या रस्त्यावर विविध विकासकामे संथगतीने सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याची झाली आहे. यामुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
राजमाता भुयारीमार्गाच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊन सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने ही विकासकामे तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे. (Latest Pune News)
या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून विकासकामे सुरू आहेत. भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौक ते दत्तनगरकडे जाणार्या राजमाता भुयारी मार्गादरम्यान तिरंगा चौकात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. राजमाता भुयारीमार्ग ते चंद्रभागानगर चौकाकडे जाणार्या रस्त्याचे काँक्रिटीकरणासह पावसाळी वाहिनी आणि ड्रेनेज लाईनचे कामही सुरू आहे.
यासाठी सातत्याने रस्ता खोदला जात आहे. सध्या या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र राजमाता भुयारीमार्गाजवळ रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत आहे.
यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार तरी कधी, असा सवाल दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विकासकामे संथ गतीने सुरू असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामुळे वाहनचालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामान करावा लागत आहे. या रस्त्यावरील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राजमाता भुयारीमार्ग ते चंद्रभागानगर चौक यादरम्यानच्या रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याच्या कामाला पावसामुळे विलंब होत आहे. पावसाळी वाहिनी, ड्रेनेजलाइन आणि काँक्रिटीकरणाचे कामही सध्या सुरू आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.-दिलीप पांडकर, उपअभियंता, पथ विभाग, महापालिका