सुनील जगताप
पुणे: जिद्दीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करणारी अवघ्या सात वर्षांची चिमुरडी रमा विश्वेश बेहरे पुण्यातील क्रीडावर्तुळात एक आश्वासक नाव बनली आहे. योगासनाच्या चटईवर तासन् तास साधना करणारी ही बालयोगिनी केवळ शारीरिक लवचिकताच जपत नाही, तर तिने आपल्या एकाग्रतेच्या बळावर वयाच्या चौथ्या वर्षापासून यशाचा असा काही 'योग' साधला की तिला पाहणाऱ्या प्रत्येकाला तिचे कौतुक वाटते. रमाचा हा प्रवास तिच्या घरातील आजी-आजोबांच्या योगासनांच्या निरीक्षणातून सुरू झाला.
घरातील संस्कार आणि स्वतःची जिद्द यांची सांगड घालत तिने 'माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट'मध्ये मनाली देव यांच्या मार्गदर्शनात आपल्या कलेला पैलू पाडायला सुरुवात केली. अवघड आसने लीलया पेलण्याची तिची वृत्ती पाहून प्रशिक्षकांनीही तिला विशेष प्रोत्साहन दिले. यशाचा हा प्रवास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता तिने जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाचा श्रीगणेशा केला.
यानंतर पुणे शहर आणि जिल्हास्तरावरील विविध स्पर्धांत सातत्याने सुवर्णपदके मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. बालेवाडी येथील 'फिट महाराष्ट्र' महोत्सवात तिने सादर केलेली योगासन प्रात्यक्षिके उपस्थितांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. केवळ योगासनेच नव्हे, तर हॅमोक योगामध्येही ती प्रावीण्य मिळवत आहे.
अभिनव इंग्लिश मीडियम शाळेत शिकणाऱ्या रमाने शारीरिक तंदुरुस्तीसोबतच आत्मविश्वास आणि एकाग्रता यांचा सुरेख संगम साधला आहे. एका चिमुकल्या पाऊलखुणांनी सुरू झालेला हा योगासनाचा प्रवास आज एका प्रेरणादायी प्रवासात रूपांतरित झाला आहे. आजच्या काळात रमाने गाठलेली ही उंची सर्व बालकांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याची जिद्द या बालयोगिनीच्या डोळ्यांत स्पष्टपणे झळकते आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे योगासारख्या खेळामध्ये लहान वयातच याची गोडी लागणे गरजेचे आहे. वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापासूनच मुलांना योग शिकवला तर आपला देश फिट इंडिया नक्कीच होईल. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांत लहान वयाची सात वर्षांची रमा बेहरे ही मुलगी असून, तिने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.मनाली देव (आंतरराष्ट्रीय योग सुवर्णपदक विजेत्या)