पुणे: केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतील प्रलंबित कामांना स्पष्ट उद्दिष्ट व कालमर्यादा निश्चित करून गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली. या वेळी केंद्रपुरस्कृत विविध योजनांसह मागील बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या प्रस्तावांना गती देताना वनाज-चांदणी चौक उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेची आर्थिक सहमती, रामवाडी-वाघोली मार्गिकेच्या आराखड्याला आवश्यक मान्यता आणि लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा डीपीआर निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या.
चांदणी चौक-घोटवडे फाटा-पिरंगुट-हिंजवडी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या मार्गाला अनुमोदन देत तो आवश्यक असल्याचे सांगितले. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील सुमारे १,४०० ग्रामपंचायतींमध्ये भारतनेट सेवा पोहचविण्यासाठी वर्षनिहाय आणि तालुकानिहाय कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वामित्व योजनेत ड्रोन मोजणी झालेल्या गावांमधील उर्वरित सनद व मिळकत पत्रिकांचे वितरण तीन महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले. जलजीवन मिशनअंतर्गत शिल्लक ३९,२५५ नळजोडण्या आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजना मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले.
पुरंदर विमानतळासाठी आत्तापर्यंत ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. तसेच, इंद्रायणी व पवना नदी प्रदूषण नियंत्रण, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्मार्ट सिटी, पीएम स्वनिधी, सूक्ष्म कृषी सिंचन, जलशक्ती अभियान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
'पीएम आवास'साठी ३,२२७ अर्ज पात्र
पीएम आवास योजना शहरी २.० अंतर्गत पुणे महापालिकेकडे प्राप्त अर्जांपैकी ३,२२७ अर्ज पात्र ठरले आहेत. मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी येथील ६,८०० घरांशी संबंधित भूसंपादन व हस्तांतरणाची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३८,४६५ घरांपैकी ९,२५८ घरे पूर्ण झाली असून २९,२०७ घरे प्रगतिपथावर आहेत.